रिता हाडके।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यापासून जैविक खात तयार करण्यासाठी महापालिकेच्या शाळांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय हरित सेनेच्या सहकार्याने मनपाच्या सात शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.जैविक खत तयार करण्यासाठी शाळांमध्ये चार-पाच फूट खोल सिमेंटच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. स्वच्छतेबाबत जागृती यावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना घरातील कचरा या टाक्यांत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचा फायदा झाला आहे. विद्यार्थी टिफिनमधील वाचलेले खाद्यान्न, घरातील कचरा, झाडांची पाने इत्यादी कचरा गोळा करून टाक्यात टाकतात. तो कचरा ओला करून त्यात खेकडे सोडले जातात. त्यानंतर काही दिवसांनी तयार होणारे खात पॅकेटमध्ये जमा केले जाते. डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा हे या उपक्रमाचे जनक आहेत. त्यांनी २०१३ मध्ये निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विजय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला होता. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी मनपाचे अधिकारी प्रोत्साहन देत आहेत. या उपक्रमासाठी विश्वकर्मा यांना वार्षिक संमेलनात पुरस्कृत करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमध्ये आली जागृतीया उपक्रमामुळे विद्यार्थी स्वच्छतेप्रती जागृत होत आहेत. ते कचरा गोळा करून त्याचे जैविक खात तयार करीत आहेत. या उपक्रमातून दर महिन्याला १० ते १२ किलो खात तयार होते. भविष्यात हा उपक्रम अन्य शाळांमध्येही राबवला जाईल.- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसादया उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी या उपक्रमाला मनापासून सहकार्य करीत आहेत. त्यांच्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. देशाकरिता जबाबदार नागरिक घडविणारा हा उपक्रम आहे.- संतोष विश्वकर्मा, मुख्याध्यापक,डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा.