नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी निगडित असलेल्या तसेच बाैद्ध वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची सहल घडविण्यासाठी रेल्वेने भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून 'आंबेडकर यात्रेचे' आयोजन केले आहे. या विशेष सहलीला बाबासाहेबांच्या अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्थळांबाबत देश-विदेशातील नागरिकांना वेगळी आस्था आहे. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी तर ही ऐतिहासिक स्थळे मोठ्या श्रद्धेचा विषय आहे. अशा या देशभरातील ठिकाणची सफर घडविण्यासाठी यंदा प्रथमच भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला. त्यानुसार, भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून 'आंबेडकर यात्रेचे' आयोजन करण्यात आले होते.
बाबासाहेबांच्या जन्म दिवसापासून अर्थात १४ एप्रिलपासून दिल्लीच्या सफदरजंग रेल्वेस्थानकातून यात्रा सुरू झाली. विशेष म्हणजे, या यात्रेला बाबासाहेबांच्या अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या विशेष रेल्वेगाडीचे सर्वच्या सर्व कोच दिल्लीतूनच हाऊसफुल्ल झाले. ८ दिवसांच्या या सहलीत सहभागी झालेल्या प्रवाशांना पहिल्या दिवशी दिल्ली, मथुरा आणि आग्रा येथील ऐतिहासिक स्थळे दाखविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचे जन्मस्थळ आंबेडकरनगर, महू, त्यानंतर नागपूर, सांची, वाराणसी, गया, राजगिर, नालंदा आणि त्यानंतर परत आगरा, मथुरामार्गे दिल्ली अशी ही आठ दिवसांची सहल होती.
दीक्षाभूमीसह ठिकठिकाणी दिली भेट
१६ एप्रिलला सकाळी ८ वाजता ही विशेष रेल्वेगाडी नागपूर स्थानकावर पोहचल्यानंतर रेल्वेगाडीतील अनुयायांची तेथे विशेष व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ही मंडळी दीक्षाभूमीवर पोहचली. येथे त्यांनी दर्शन घेतल्यानंतर नागपूर शहर आणि आजुबाजुला असलेल्या बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित स्थळीसुद्धा ही मंडळी पोहचली होती. दिवसभर विविध स्थळे बघितल्यानंतर रात्री ९ वाजता ही मंडळी पुढच्या प्रवासाला निघाली.