‘मणिदा’ आधुनिक चित्रकलेचे प्रणेतेचनागपूर : के.जी.सुब्रमण्यम् (मणिदा) यांच्या मार्गदर्शनातून पिढी घडली. लहान थोर सर्वांना समान समजणारे ‘मणिदा’ खऱ्या अर्थाने आधुनिक चित्रकलेचे प्रणेते होते व त्यांच्या निधनामुळे चित्रकलेच्या ‘कॅन्व्हास’वरील आदर्श व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरविले आहे. हे शब्द होते कुंचल्याच्या माध्यमातून चित्राला जिवंत करणाऱ्या नागपुरातील चित्रकारांचे.जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रकार के. जी. सुब्रमण्यम् (मणिदा) यांचे २९ जूनला निधन झाले. त्यांना लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे शनिवारी शहरातील अनुभवी, तरुण चित्रकारांनी आदरांजली अर्पण केली. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, छापखाना ग्रुप व कलाश्रय ग्रुपच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला नागपुरातील प्रसिद्ध चित्रकार सुभाष तुलसिता प्रामुख्याने उपस्थित होते. पर्णचित्र व रेखाचित्रात हातखंडा असलेल्या सुभाष तुलसिता यांनी यावेळी ‘पॉवर पॉईन्ट’ सादरीकरण केले. या माध्यमातून त्यांच्या चित्रांतील बारकावे व गर्भितार्थ उपस्थितांसमोर मांडले. तुलसिता यांनी अनेक कवींच्या कवितांवर आधारित चित्ररचना केली आहे. एक छंद म्हणून त्यांनी चित्रकला जोपासली व चित्रकार म्हणून नावलौकिकदेखील मिळविला हे विशेष. तत्पूर्वी उपस्थित चित्रकारांनी के.जी.सुब्रमण्यम् यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. सोबतच ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेलादेखील माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सुब्रमण्यम यांच्या प्रसिद्ध चित्रांचे, फोटोप्रिंटचे प्रदर्शन गॅलरीत प्रदर्शित करण्यात आले होते. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचेदेखील यावेळी सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांनी यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जेष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्यासह मिलिंद लिंबेकर, सदानंद चौधरी, शेखर तांडेकर, महेश मानकर, अभिषेक चौरसिया, अमोल हिवरकर, विशाल सोरते हे प्रामुख्याने उपस्थित होते. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजन : के.जी.सुब्रमण्यम् यांना श्रद्धांजली
By admin | Published: July 03, 2016 2:52 AM