नागपूर : लोकमतचे संस्थापक-संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकमत माध्यम समूहातर्फे प्रसार माध्यमांवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार, २० ऑगस्ट रोजी करण्यात येत आहे. भारतीय प्रसार माध्यमांचे पूर्णत: ध्रुवीकरण झाले आहे का? असा या परिषदेचा विषय असून, परिषदेला प्रमुख अतिथी व मुख्य वक्ता म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, विशेष अतिथी व परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा व सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा परिषदेला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत दोन सत्रात ही परिषद होणार आहे. परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘द प्रिंट’चे मुख्य संपादक शेखर गुप्ता, इंडिया टुडे टीव्हीचे सल्लागार संपादक व वृत्तनिवेदक राजदीप सरदेसाई, न्यूज २४ व इंडिया टीव्हीचे माजी व्यवस्थापकीय संपादक व वरिष्ठ पत्रकार अजित अंजूम, डब्ल्यूआयओएनच्या संपादक व आंतरराष्ट्रीय वृत्त कार्यक्रम ग्रॅव्हीटासच्या होस्ट पालकी शर्मा उपाध्याय, ‘द वायर’च्या वरिष्ठ संपादक आरफा खानुम शेरवानी हे वक्ते आपली भूमिका मांडणार आहेत.
दुसऱ्या सत्रात नागपूर व औरंगाबादचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे माजी संपादक एस. एन. विनोद, हिंदुस्तान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी न्यूजच्या विदर्भ संपादक सरिता कौशिक आपल्या भूमिका मांडतील. या सत्राचे संचालन लोकमत नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने करतील. या परिषदेला मध्य भारतातून ५०० हून अधिक पत्रकार व पत्रकारितेचा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.