नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या यशवंत स्टेडीयमस्थित संयुक्त प्रादेशिक केंद्र-सी.आर.सी. (दिव्यांगजन) यांच्या मानसशास्त्र विभागाद्वारे दिव्यांग युवकांसाठी ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. १० मार्च रोजी ‘ऑनलाईन’ माध्यमातून हे आयोजन होईल.
दिव्यांग युवकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बाबींसह त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातील न्यूनगंड काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती-मधील कला आणि संस्कृतीचा अर्थ ओळखणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. यात कर्ण-बधिर युवक व बौद्धिक दिव्यांग युवकांसाठी नृत्य स्पर्धा, अंध तथा दृष्टिबाधित प्रवगार्तील दिव्यांग युवकांसाठी गायन स्पर्धा तसेच कर्ण-बधिर युवक व बौद्धिक दिव्यांग, ऑटिझमग्रस्त युवकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन होईल, अशी माहिती विभागप्रमुख अपर्णा भालेराव-पिंपळकर यांनी दिली. यात सहभागी होण्यासाठी कोणताही नोंदणी शुल्क नाही. वय वर्ष १८ ते ३५ वर्षे वयोगटातील सर्व दिव्यांग यात सहभागी होऊ शकतात, असे सी.आर.सी. नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे यांनी सांगितले.