नागपूर : झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) मार्गदर्शनात मंगळवारी ७९व्या मेंदू मृत (ब्रेनडेड) व्यक्तीचे मंगळवारी अवयवदान करण्यात आले. केयल कुटुंबाच्या पुढाकारामुळे या अवयवदानातून दोन रुग्णांना जीवनदान मिळाले.
भावना बालमुकुंद केयल (४८) रा.भांडेवाडी असे त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, भावना यांच्यावर चार वर्षांपूर्वी मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. तिची २५ नोव्हेंबरला अचानक प्रक्रृती खालावल्याने तिला लगडगंज येथील न्यू ईरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २९ नोव्हेंबर रोजी तिचा मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिली.
न्यू ईरा रुग्णालयातील हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.आनंद संचेती व मेंदूरोग तज्ज्ञ डॉ.नीलेश अग्रवाल यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भावना यांचे पती बालमुकुंद व मुलगा शुभम केयल यांनी त्या दु:खातही पुढाकार घेत अवयवदानाला होकार दिला. याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ.विभावरी दाणी व सचिव डॉ.संजय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात समितीच्या समन्वयक विना वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार, न्यू ईरा रुग्णालयातील ५६ वर्षीय पुरुषाला यकृत तर ५४ वर्षीय महिलेला मूत्रपिंड दान करून त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड योग्य नसल्याचे निदर्शनात आल्याने त्याचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही.