नागपूर -अनाथांना आधार देणे, त्यांचे दु:ख कवटाळणे ही मानवसेवा आणि हीच ईश्वरसेवा आहे. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचा हा संदेश स्वीकारून सामाजिक कार्यकर्त्यांनी बालसदनला राहणाऱ्या अनाथ अभिषेक पराडे या विद्यार्थ्याचा निवासाचा प्रश्न साेडविला. त्याला हक्काचे घर देऊन त्याच्या वेदनांवर फुंकर घातली.
पाेलीस लाईन टाकळी चाैक, काटाेल राेड येथे बालसदन आहे. विदर्भ सहायता समितीद्वारे संचालित या बालसदनात आईवडिलांचे प्रेम गमाविलेली अनाथ मुले, तांड्या-पाड्यावर राहणारी मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, गरीब पालकांच्या आर्थिक विवंचनेतून शिकू न शकणारी मुले येथे राहतात आणि शिकतात. तुकडाेजी महाराजांची ग्रामगीता हीच या बालसदनची प्रेरणा. या बालसदनमध्ये सातव्या वर्गात असलेल्या अभिषेकचे एक दिवस आगमन झाले. बालपणी आईचे छत्र हरपले तर माेलमजुरी करणाऱ्या वडिलांनीही एक दिवस जगाचा निराेप घेतला. पुरता पाेरका झालेला अभिषेक आता कुणाच्या आधाराने राहील, हा प्रश्न हाेता. त्यामुळे त्याच्या शिक्षिकेने त्याला येथे आणले हाेते. तेव्हापासून हे बालसदनच त्याचे आधारवड झाले. सातवीत असताना आलेला अभिषेक आज बारावीचे शिक्षण घेत आहे. मात्र वयाचे बंधन असल्याने बारावीनंतर बालसदन सुटेल व आपण पुन्हा अनाथ हाेऊ हे दु:स्वप्न त्याला अस्वस्थ करीत हाेते. अशावेळी मदतीसाठी धावले प्रशांत हाडके.
प्रशांत हाडके हे शिक्षक. मानवसेवेची निष्ठा बाळगणारे प्रशांत बालसदनच्या मुलांनाही शिकवायला येतात व यातूनच या मुलांशी त्यांची मैत्री जुळली. त्यांच्या मार्गदर्शनात मुलांनी श्रमदानातून या परिसरात ‘श्रीगुरुदेव नर्सरी’ फुलविली. येथील मुले आपली सुख-दु:खे सहज त्यांच्यासमाेर बाेलून जातात. त्यांच्या डाेळ्यातून अभिषेकची उदासीनता सुटू शकली नाही. त्यांनी विचारले तर, बारावीनंतर मी कुठे राहणार? या त्याच्या प्रश्नाने त्याच्या निराशेचे कारण समजले. अभिषेकच्या वडिलांनी तयार केलेले पकड झाेपडे असल्याची बाब चर्चेतून पुढे आली. त्यानंतर प्रशांत यांनी अभिषेकला त्याचे घर बांधून द्यायचे, हा संकल्प केला. त्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत घेतली. ते झाेपड कचरा व झाडाझुडपांनी वेढले हाेते. सर्वांच्या श्रमदानातून ते साफ करण्यात आले. गेल्या वर्षी बांधकामाचे भूमिपूजन झाले आणि हळूहळू ते झाेपडे घराच्या रूपात उभे राहिले. नुकतेच १६ फेब्रुवारीला त्या घरात अभिषेकचा गृहप्रवेशही झाला. त्याला त्याच्या हक्काचे घर मिळाले. अनाथाला आधार देण्याच्या मानवीय संकल्पातून एका निरागस जीवनाचे स्वप्न पूर्ण झाले.