‘आॅनलाईन’ची भीती : संकेतस्थळ ‘हँग’ झाल्यास होणार धावाधाव नागपूर : मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे तीन दिवस हे उमेदवारांसोबतच प्रशासनासाठीदेखील धावपळीचे ठरणार आहेत. या कालावधीत हजारो उमेदवार ‘आॅनलाईन’ नोंदणी करणार आहेत. पहिल्या दिवसाचा अनुभव पाहता अचानक अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढीस लागल्यावर संकेतस्थळ ‘हँग’ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऐनवेळी असे झाले तर उमेदवारांची अर्ज भरण्याची संधीच हुकण्याची शक्यता आहे. यंदाच्या मनपा निवडणूकांत उमेदवारांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर शुक्रवारी सकाळी ११ पासून आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली व ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवार ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करू शकणार आहे. मंगळवारपर्यंत ९८८ इच्छुक उमेदवारांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी केली. भाजपा, कॉंग्रेससह बहुतांश पक्षांनी अद्यापही उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेकांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. उमेदवार यादी जाहीर होण्याची किंवा ‘एबी फॉर्म’ मिळण्याची प्रतीक्षा न करता अनेक इच्छुक बुधवारपासून ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करतील. अशा स्थितीत संकेतस्थळ ‘हँग’ होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर उमेदवारांसमोर ऐनवेळी मोठा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तज्ज्ञ म्हणतात, होऊ शकते ‘हँग’ अचानक संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली तर नक्कीच ‘सर्व्हर’वर ‘लोड’ वाढू शकते. जर तांत्रिकदृष्ट्या यासंदर्भात काळजी घेतली नसेल तर संकेतस्थळ ‘हँग’ होऊ शकते. पहिल्या दिवसाचा अनुभव लक्षात घेता संकेतस्थळात सुधारणा होणे अपेक्षित आहे, असे मत संगणकतज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले. पहिल्या दिवशीच बसला होता फटका अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तांत्रिक दोष निर्माण झाला होता. नगरसेवकांची कार्यालये, पक्षांची कार्यालये, इंटरनेट कॅफे, व्यक्तिगत लॅपटॉपवरही तासन्तास प्रयत्न करूनही अर्ज भरण्याची प्रकिया पूर्ण होऊ शकली नाही. सुरुवातीपासूनच वेबसाईटमध्ये तांत्रिक दोष दिसून आला. दिवसभर प्रयत्न करूनही यश न आल्यामुळे त्रस्त झालेल्यांनी महापालिकेतील निवडणूक विभागाचे कार्यालय गाठून तक्रारदेखील केली.
-तर उमेदवारांची संधी हुकणार
By admin | Published: February 01, 2017 2:23 AM