अपंगांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आयोजन : २१ ला उद्घाटन नागपूर : अपंगांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी, जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी व त्यांचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ अपंगांचे राज्यस्तरीय साहित्य व कला संमेलन आयोजित करते. गेल्या वर्षी अपंगांचे पहिले संमेलन नागपुरात पार पडले होते. यंदाचे संमेलनाचे दुसरे वर्ष आहे. हे संमेलन कल्याण महानगरपालिकेच्या पुढाकाराने आचार्य अत्रे सभागृह, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम येथे २१ व २२ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, राज्यमंत्री संजय सावकारे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, कल्याण महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्यासह सिनेसृष्टीतील कलावंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘भरारी-२०१४’ या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी निघणार आहे. संमेलनात परिसंवाद, कथाकथन, गीत, संगीत, नृत्य याचबरोबर अपंगांच्या जीवनातील अनुभव कथन, अपंगांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, अपंगांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन होणार आहे. यशस्वी अपंग व्यावसायिक व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अपंगांचा सत्कार करण्यात येणार आहे. या संमेलनासाठी नागपुरातून एक रेल्वेची विशेष बोगी आरक्षित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नागपुरात झालेल्या संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सरकारनेही या उपक्रमाचे कौतुक केले होते. सरकारच्या पाठिंब्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही हे संमेलन आयोजित करण्यात यश आले असल्याचे महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गजानन वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अपंगांचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य व कला संमेलन कल्याणमध्ये
By admin | Published: July 28, 2014 1:26 AM