लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत भिवापूर तालुक्यातील मतदार भाग याद्यांमध्ये १२० मतदारांचे छायाचित्र नाही. त्यामुळे अशा मतदारांनी स्वत:जे रंगीत छायाचित्र संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात ३० जूनपर्यंत जमा करावे. अन्यथा यादीत छायाचित्र नसलेले मतदार स्थलांतरीत झाल्याचे ग्राह्य धरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.
तालुक्यात एकूण ६८,५६५ मतदार आहेत. त्यात पुरूष ३५,१२७ तर महिला मतदार ३३,४३८ आहे. त्यापैकी १२० मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही. त्यामुळे निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करतेवेळी मतदारांची ओळखपरेड करणे संबंधित मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना कठीण होते. यावरून अनेकदा वादविवाद होतात. एकाच नावाचे दोन मतदार असल्यास घोळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मतदार यादीमध्ये प्रत्येक मतदाराचे छायाचित्र आवश्यक आहे. याची दखल घेत, निवडणूक विभागाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांच्या पत्त्यावर पाठवून त्यांचे छायाचित्र गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहे. अनेक मतदार स्थलांतरीत झाल्यामुळे ते मतदार यादीतील नमूद पत्त्यावर आढळून आले नाही. त्यामुळे गृहभेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी संबंधित मतदार नमूद पत्त्यावर राहत नसल्याचा पंचनामा केला. शिवाय तशा याद्या तयार करून सार्वजनिक ठिकाण, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर पंचायत कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनासुद्धा देण्यात आली असून, तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे किंवा तहसील कार्यालय येथे जमा करावे. अन्यथा छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.
===Photopath===
160621\img-20200226-wa0093.jpg
===Caption===
तहसील कार्यालय भिवापूर