आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारात्मक राहिली आणि आम्हालाही योग्य प्रतिनिधीत्व मिळाले तर ठिक अन्यथा बीआरएसपी महाराष्ट्रात २० ते २५ जागा लढवणार, असे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी)चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड. सुरेश माने यांनी येथे स्पष्ट केले.
बीआरएसपीतर्फे नागपुरात आयोजित निवडणूक जाहीर सभेसाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. एड. माने म्हणाले, भाजप-मोदी सरकारच्या धोरणांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. बीआरएसपी ही महाविकास आघाडीसोबत आधीपासूनच आहे. त्यामुळे त्यांच्या चर्चा सुरू आहे. आघाडीच्या जागावाटपाचा प्रश्न अजुनही पूर्णपणे सुटलेला नाही. आम्ही कोणत्याही जागांवर दावा सांगितलेला नाही, मात्र पक्षाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे. येत्या २० मार्चपर्यंत चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज, आयएनएल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद सुलेमान, माजी खासदार रामबक्श वर्मा, साहेबसिंग धनगड, रमेश पाटील, एल.के. मडावी उपस्थित होते.
‘वंचित’ महाविकास आघाडीची डोकेदुखी
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आपली डोकेदुखी वाढवून घेतली आहे. महाविकास आघाडीला याची जाणीव झाली असून ही डोकेदुखी आणखी वाढणार असल्याची टीका एड. सुरेश माने यांनी यावेळी केली.