नागपूर : ‘लोकमत’ने शहरात किती अनधिकृत बाजार आहेत, बाजारात मूलभूत सुविधांचा अभाव, अत्याधुनिक बाजार उभारण्याची गरज इत्यादीसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. यावर दोन आठवड्यात उत्तर सादर केले नाही, तर महानगरपालिका आयुक्तांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने बाजारांच्या दयनीय अवस्थेची दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. अॅड. शशिभूषण वाहाणे न्यायालय मित्र आहेत. त्यांनी ‘लोकमत’मधील वृत्त न्यायालयासमक्ष सादर केले होते. न्यायालयाने पुरेसा वेळ देऊनही मनपाने यावर उत्तर सादर केले नाही. यामुळे वरीलप्रमाणे निर्देश देण्यात आले. शहरातील कॉटन मार्केट, सक्करदरा बाजार, मंगळवारी बाजार, नेताजी मार्केट, गोकुलपेठ बाजार यासह विविध बाजारांची अत्यंत वाईट अवस्था आहे. बाजारांत सर्वत्र घाण पसरली आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. महानगरपालिकेतर्फे बाजारांची नियमित सफाई केली जात नाही. मोकाट कुत्री व अन्य जनावरे बाजारभर फिरत असतात. बाजारांतील अस्वच्छतेमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. बाजारांत स्वच्छता गृहासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. यामुळे विशेषत: महिलांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते.(प्रतिनिधी)
-तर मनपा आयुक्तांनी हजर रहावे
By admin | Published: March 24, 2016 2:41 AM