भिवापूर : शासनाने लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून शिधावस्तू वितरण धोरणाची अंमलबजावणी केली आहे. वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी अंत्योदय व प्राधान्य गट योजनेच्या शिधापत्रिकेवरील ज्या लाभार्थ्यांचे अद्यापपर्यंत आधार सिडिंग झालेले नाही, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ जानेवारीपर्यंत आधार व मोबाईल नंबर सिडिंग करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी केले आहे.
पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या शिधापत्रिकेवरील ज्या सदस्याचे आधार व मोबाईल क्रमांक सिडिंग झालेले नाही. अशा सदस्यांचे आधार सिडिंग करण्यासाठी संबंधित रास्तभाव दुकानात जाऊन ई-पॉस उपकरणामधील ई-केवायसी व मोबाईल सिडिंग सुविधेचा वापर करून ३१ जानेवारीपर्यंत आधार व अधिकृत मोबाईल क्रमांकाची सिडिंग करून घ्यावे. शिधापत्रिकेवरील ज्या सदस्याचे सिडिंग होणार नाही, अशा लाभार्थ्याचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडिंग होईपर्यंत निलंबित करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा निरीक्षक सुखदेव बोडी यांनी दिली. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी सिडिंगचे कार्य पूर्ण करून शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला यशस्वी करण्याचे आवाहन तहसीलदार कांबळे यांना केले आहे.