मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांचे कारागृहातील कैद्यांना संबोधन नागपूर : जैन संत आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांनी शनिवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जाऊन तेथील कैद्यांना प्रवचनात उपदेश दिले. उपदेशात त्यांनी बंदिवानांना स्वत:च्या जीवनाशी मैत्री करा, असे आवाहन केले.महाराजांनी आपल्या प्रवचनाची सुरुवात भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगून केली. त्यांनी सांगितले की, डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी एकदा रेल्वे प्रवासादरम्यान स्टेशनवर लोकांना बादलीने पाणी पाजणे सुरू केले. हे पाहून लोकांनी त्यांना प्रश्न केला. त्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सर्व मानवांमध्ये एक समान आत्मा विद्यमान असल्याचे उत्तर दिले होते. प्रतीकसागरजी महाराज पुढे म्हणाले, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यामध्ये मानवीयतेची शक्ती होती. समता भावनेची हीच शक्ती श्रीराम, श्रीकृष्ण, गुरू नानकदेव, भगवान महावीर आणि बुद्ध यांच्यात होती. प्रत्येक माणसामध्ये या शक्तीचा वास असतो. महापुरुषांनी या शक्तीचा उपयोग प्राणिमात्रांच्या उत्थानासाठी केला व त्यामुळेच ते महान झाले. स्वत:मधील शक्तीचा जो जसा उपयोग करतो, त्याचे व्यक्तिमत्त्व तसे होते. ती व्यक्ती जगात राहून त्याचप्रमाणे कार्य करीत असते. मुनीश्री पुढे म्हणाले, तुम्हाला जन्म देणाऱ्या आईने तुम्ही मोठे व्यक्ती होण्याचे स्वप्न पाहिले असेल. मात्र तुम्ही स्वत:च्या आंतरिक शक्तींना ओळखले नाही. या आंतरिक शक्तींचा दुरुपयोग केल्यानेच आज कारागृहात जावे लागल्याचे ते म्हणाले. मात्र या ठिकाणाला कारागृह समजू नका. हे कारागृह नसून तुम्हाला चांगल्या मार्गावर नेण्याचे स्थान आहे. याला कारागृह नव्हे सुधारगृह समजून जीवन जगा. जो व्यक्ती आपल्या धर्माचे पालन करतो, तो जीवनात मोठेपण प्राप्त करीत असतो. मुनीश्रींनी सांगितले की, मनुष्याच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या समस्या नेहमीच येत असतात. मात्र धर्माच्या मार्गाने चालूनच या समस्यांचे समाधान काढले जाऊ शकते. वाईट मार्गाने चालल्यास जीवनात वाईटच होईल. जीवनात वाईट मार्गाने नेणारे बरेच मित्र भेटतात. त्यामुळे कुणाला मित्र बनविण्यापेक्षा स्वत:च्या आयुष्याशी मैत्री करा. आयुष्याला मित्र बनविले तर तुम्ही जीवनाला समृद्ध कराल आणि जीवन तुम्हाला समृद्ध करेल. कारागृहाला आयुष्य बदलण्याचे माध्यम माना. येथून बाहेर पडताना आपल्या कार्याने समाजात मोठे नाव करण्याचा संकल्प घ्या. येथे केवळ वेळ घालविण्यासाठी नाही, तर स्वत:ला बदलण्यासाठी आले आहात, असे गृहित धरा. स्वत:चे मन शांत ठेवा, असे आवाहन मुनीश्री यांनी बंदिवानांना केले. शनिवारी सकाळी मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज मोठ्या संख्येने उपस्थित श्रावक-श्राविकांसह कारागृहात पोहचले. यावेळी कारागृहाचे उपअधीक्षक सुनील निघोट, जेल ग्रुप वनचे के.बी. मिरासे, जेलर कन्नेवार, करघे, योगेश पाटील, संजीव हटवादे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
आपले आयुष्य हेच आपले मित्र
By admin | Published: June 12, 2016 2:37 AM