शरद मिरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी उठल्यापासून मिरची कटाईची लगबग सुरू होते. उन्हाचा पारा अन् घामाच्या धारा त्यातही मिरचीच्या सहवासात राहिल्याने अंगाची लाहीलाही. हिवाळा असो वा पावसाळा हा नित्यक्रम ठरलेलाच. डोळ्यांची आग, पाठीला वाक आणि बसण्याचा त्रास सोसत या महिलांना रोजगार मिळाला खरा, परंतु त्यांच्या वेदनांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सततच्या मिरचीच्या सहवासामुळे कटाई मजुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा गौरव होत असला तरी ‘आमच्या नशिबी फक्त उपेक्षाच’ असल्याची व्यथा मिरची कटाई केंद्रावरील महिलांनी मांडली.गेल्या ४० वर्षांपासून भिवापुरातील मिरची कटाई केंद्र रोजगाराचे केंद्र ठरले आहे. मिरचीच्या सातऱ्यावर कटाईचे काम वर्षभर सुरू असते. येथे मजुरांना वयाचे बंधन नाही. त्यामुळे लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सारेच मिरची कटाईच्या कामाला जुंपतात. यात महिला, मुली व म्हाताऱ्या आजीबाईची संख्या लक्षणीय आहे.रोजगार मिळाला, त्यासोबत वेदनादेखील. सतत मिरचीच्या ढिगावर काम करताना मजुरांना प्रचंड वेदना होतात. संपूर्ण शरीराची, डोळ्याची आग पेटते. तिखटाची खेस यामुळे खोकला व सर्दीने हे मजूर भांबावले असतात. सलग १२ तास एकाच जागेवर बसून काम करताना मजुरांना पाठीचा त्रास, सांधेदुखीचे प्रमाण वाढले आहे. मात्र रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने शेकडो हात आपल्या कुटुंबाचा गाढा पुढे रेटावा म्हणून राबत आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्याच्या समस्या या सर्वांचा निपटारा करीत हे मजूर मिरची कटाईवर मिळणाऱ्या अल्पमजुरीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
आरोग्य समस्या वाढल्यासकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मजूर मिरचीच्या मुख्या काढतात. काही महिला मजूर ओली मिरची हाताने पसरविण्याच्या कामी असतात. सतत मिरचीच्या सहवासामुळे मजुरांना आरोग्याच्या समस्या वाढल्या आहे. शरीराला खाज सुटणे, आग होणे, डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, अंधुकपणा, सर्दी, खोकला, पाठीचा कणा, सांधेदुखी, शरीरावर चट्टे पडणे तसेच महिलांमध्ये हिमोग्लोबीन कमी होऊन अॅनेमियासारख्या आजार वाढत असल्याचे वैद्यकीय अभ्यासात उघड झाले आहे.
‘ते’ फिरकतही नाहीत...मिरची कटाई केंद्रावरील महिलांना भेडसावणाऱ्यां आरोग्य समस्या नवीन नाहीत. सत्ता बदलली, नेतेही बदलले मात्र समस्या सुटल्या नाही. तालुक्यात सद्यस्थितीत ६ ते ७ मिरची कटाई केंद्र आहे. एका केंद्रावर किमान ४०० च्या जवळपास मजूर असतात. निवडणुका आल्या की, प्रत्येक उमेदवार या केंद्रांना हमखास भेटी देतो. महिला मजुरांच्या आरोग्यविषयक समस्येची आस्थेने विचारपूस करतात. अनेक प्रलोभने देतात. त्यानंतर मात्र ‘ते’ इकडे फिरकतदेखील नाही, अशी व्यथा महिलांनी मांडली. किमान महिलादिनी या मिरची कटाई केंद्रावर एखादा लोकप्रतिनिधी येईल आणि उपेक्षेच जीणं जगणाऱ्यां या महिला मजुरांच्या कार्याचा गौरव करेल, ही आशाही फोल ठरत आहे.