पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधान मोदी यांनी आरएसएस मुख्यालय आणि दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी, त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, 'आपण आपल्या देशाचा इतिहास पाहिला, तर शेकडो वर्षांची गुलामी, अनेक आक्रमणांचा सामना केला, भारताचे अस्तित्व संपवण्यासाठी विविध प्रकारचे क्रूर प्रयत्न झाले, मात्र भारताच्या चेतनेला कधीही धक्का पोहोचला नाही. तिची ज्योत सातत्याने तेवत राहिली. कारण अत्यंत कठीण काळातही, सामाजिक आंदोलने होत राहिले." या वेळी, संघाच्या योगदानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "संघाची अनेक वर्षांची तपश्चर्या आज भारतासाठी एक नवा अध्याय लिहीत आहे.
पंतप्रधान म्हणाले, १०० वर्षांपूर्वी लावले गेलेले संघाचे रोपटे आता वटवृक्ष (वडाचे झाड) बनले आहे. हा सामान्य वटवृक्ष नाही, तर भारताचा अक्षय वटवृक्ष बनला आहे. जो भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेला ऊर्जावान बनवत आहे. संघासाठी सेवा हीच साधना आहे. आमचा मंत्र, 'देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र' आहे. 'सेवा' ही भावना स्वयंसेवकांना थकू देत नाही. राष्ट्र यज्ञाच्या या पवित्र अनुष्ठानात मला आज येथे येण्याचे सौभाग्य मिळाले आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "स्वयंसेवक आपला आणि दुसऱ्याचा, असा भेदभाव न करता सदैव मदतीसाठी सरसावतात. गुरुजींनी संघाची तुलना प्रकाशाशी केली होती. कोणत्याही आपत्तीच्या वेळी स्वयंसेवक सर्वप्रथम पोहोचतात. गुरुजींची शिकवण आपल्यासाठी जीवनमंत्र आहे."
याच बरोबर, "१०० वर्षांत संघ एक महान वटवृक्ष बनला आहे. स्वयंसेवक निःस्वार्थपणे लोकांना मदत करतात. महाकुंभमेळ्यादरम्यान, स्वयंसेवकांनी महाकुंभात येणाऱ्या भाविकांची खूप सेवा केली आणि त्यांना विविध प्रकारची मदतही केली.