लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरला रविवारी २६ मे रोजी शून्य सावली स्थिती राहणार आहे. यानुसार आपल्याला आपली सावली दिसणार नसल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले आहे.रविवारी २६ मे रोजी सूर्य वृषभ राशीत १० अंश, २१ कला आणि ५० विकलावर राहणार आहे. नागपूर येथे सकाळी ५.४४ वा सूर्योदय असून, त्या दिवशी अवकाशात सूर्य १३ तास ९ मिनिट दिसणार आहे. सूर्याचा अस्त म्हणजे सूर्यास्त सायंकाळी ६.५४ वाजता आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच सूर्य स्वत:भोवती गिरक्या घेत असतो. सूर्य उत्तरेकडे २३.५ डिग्रीपर्यंत भ्रमण करतो म्हणजे उत्तरायण हे अत्यंत शुभ असून घर, दुकानांचे वास्तूपूजन, मुलांच्या मौंजीसाठीचे मुहूर्त उत्तरायण असताना निवडतात. या पार्श्वभूमीवर सूर्य दुपारी आपल्या डोक्यावर येतो आणि आपली सावली आपल्याला दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. नागपूरला रविवारी २६ मे रोजी दुपारी १२.१० वाजता शून्य सावली स्थिती राहील, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. पृथ्वीच्या भ्रमणानुसार नागपूर विभागात ही स्थिती २४ मे ते २८ मे राहणार असून, भिवापूर १२.०८ वाजता, उमरेड १२.०९ वाजता २४ मे रोजी, कुही २५ मे १२.०९, २६ मे मौदा १२.०९, कामठी १२.१०, कळमेश्वर १२.१०, काटोल २७ मे १२.१२ वाजता, पारशिवनी १२.१० वाजता. रामटेक १२.०९, हिंगणा १२.१०, सावनेर १२.१५ वाजता, त्याचप्रमाणे नरखेडला २८ मे रोजी १२.१३ वाजता शून्य सावली स्थिती राहणार आहे. या वेळेस कुठल्याही प्रकारची सावली दिसणार नाही. जेव्हा संकटे येतात तेव्हा माणसाची सावली सोडून जाते, असे म्हणतात. परंतु ही खगोलशास्त्रीय घटना असून, त्याचा मानवावर काहीही परिणाम होत नाही. तरी प्रत्येकाने या खगोलशास्त्रीय घटनेचा आनंद घेऊन या प्रसंगाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे.