लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काटोल तालुक्यातील एकूण १,३९२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले हाेते. यातील १,२२७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, १६५ विद्यार्थी काही कारणास्तव अनुपस्थित राहिले.
ही परीक्षा घेण्यासाठी तालुक्यात एकूण नऊ परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली हाेती. यात इयत्ता पाचवीचे पाच तर इयत्ता आठवीचे पाच परीक्षा केंद्र हाेते. इयत्ता आठवीतील एकूण ५५७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले हाेते. यातील ४९५ विद्यार्थी परीक्षेला बसले तर ६२ विद्यार्थी गैरहजर राहिले. इयत्ता पाचवीच्या एकूण ८३५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यातील ७३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर १०३ विद्यार्थी काही कारणास्तव अनुपस्थित राहिले.
ही परीक्षा सर्वच केंद्रावर व्यवस्थित, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, विस्तार अधिकारी (शिक्षण) संतोष सोनटक्के, नरेश भोयर यांच्यासह तालुक्यातील केंद्रप्रमुख, केंद्र संचालक, शिक्षक व आरोग्यसेविकांनी सहकार्य केले.
...
उपाययाेजनांचे काटेकाेर पालन
काेराेना संक्रमण लक्षात घेता प्रत्येक परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेत उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्यात आले. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान नाेंदवून घेत त्यांचे हात सॅनिटाईझ करण्याची व्यवस्था केली हाेती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मास्क अनिवार्य करण्यात आला हाेता. आरोग्यसेविकांचीही नियुक्ती करण्यात आली हाेती.