६.८३ कोटीहून अधिक महसूल जमा : २१ जानेवारीपर्यंत पाणी बिलावरील विलंब शुल्क माफ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या जलप्रदाय विभागाचे ३.७२ लाख ग्राहक असून, यातील २.५७ लाख ग्राहकांकडे २१२.६७ कोटींची थकबाकी आहे. यातील १८ हजार ९८२ हून अधिक पाणी ग्राहकांनी महापालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा लाभ घेतला आहे. यातून १५ जानेवारीपर्यंत मनपा तिजोरीत ६.८३ कोटीहून अधिक महसूल जमा झाला आहे.
मागील काही वर्षांत देयक न भरल्याने अनेक ग्राहकांची विलंब शुल्काची रक्कम मुद्दलाहून अधिक झालेली आहे. परंतु अभय योजनेंतर्गत विलंब शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी मनपाने १० झोनमध्ये २२ बिलिंग काऊंटर्स सुरू केले आहेत. आठवड्यातील सर्व कामाच्या दिवशी हे काऊंटर्स सकाळी ८ ते ४ किंवा काही ठिकाणी सकाळी ८ ते ५ सुरू असतात. मनपाने नागरिकांच्या सुविधेसाठी हे काऊंटर्स रविवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच थकबाकीदर पेटीएमद्वारेही आपली थकीत रक्कम भरू शकतात. मात्र इतर ऑनलाईन पर्याय थकबाकीदारांसाठी उपलब्ध नाही.
...
२१ पर्यंतच १०० टक्के विलंब शुल्क माफ
२१ डिसेंबर ते २१ जानेवारी २०२० दरम्यान पाणी बिलावरील विलंब शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. तर २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान विलंब शुल्कावर ७० टक्के सूट देण्यात येईल. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थायी समिती व जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी केले आहे.
.....