काटोल/उमरेड/ रामटेक/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यांत करण्यात आलेल्या २८१३ चाचण्यांपैकी केवळ ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बुधवारी ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर ग्रामीण भागात सक्रिय रुग्णांची संख्या ५१३ वर आली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,५४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १,३९,३२४ कोरोनामुक्त झाले, तर २२९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रामटेक तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६५३४ इतकी झाली आहे. यातील ६३८४ कोरोनामुक्त झाले, तर १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १५० इतकी आहे.
काटोल तालुक्यात २९० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. कुही तालुक्यात मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० जणांची चाचणी करण्यात आली. तीत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उमरेड तालुक्यात ग्रामीण भागात ४ रुग्णांची नोंद झाली.