नागपूर : शाळा सुरू करणे हे आता प्रशासनासाठी चांगलेच डोईजड झाले आहे. गुरुवारपर्यंत झालेल्या जिल्ह्यातील एकूण शिक्षकांच्या टेस्टमध्ये ४१ शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे गुरुवारपर्यंत केवळ ३० टक्के शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या. त्यामुळे पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. अशात स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेते हे बघणे महत्त्वाचे आहे.
९ ते १२ वर्गाच्या शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची टेस्ट करून, त्याचा अहवाल विभागाला द्यायचा आहे. त्यामुळे शनिवारी शहरातील कोरोनाच्या तपासणी केंद्रावर मोठ्या संख्येने शिक्षक टेस्टसाठी आले होते. सध्या शिक्षण विभागाकडे गुरुवारपर्यंत ज्या शिक्षकांनी टेस्ट केली, त्यांचे अहवाल आले आहे. त्या अहवालानुसार शहरात १६ व ग्रामीणमध्ये २५ असे ४१ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात १२५० शाळेतील १२०३१ शिक्षकांपैकी ६८२३ शिक्षकांनी कोरोनाची टेस्ट केली होती. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या टेस्टचे अहवाल पुढील दोन दिवसात येण्याची अपेक्षा आहे.
- नागपूर ग्रामीणमध्ये झालेल्या टेस्ट
शाळा संख्या शिक्षक संख्या चाचणी संख्या पॉझिटिव्ह
६५७ ५७७९ ३१७३ २५
- नागपूर शहरात झालेल्या टेस्ट
शाळा संख्या शिक्षक संख्या चाचणी संख्या पॉझिटिव्ह
५९३ ६२५२ ३६५० १६
- जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार अहवाल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षण विभाग जिल्ह्यात दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेत आहे. जिल्ह्यातील एकूण शिक्षकांची चाचणी, त्याचे आलेले अहवाल, जिल्ह्याची परिस्थिती, सोयीसुविधांची उपलब्धता यावरून जिल्हाधिकारी शाळा सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेतात हे बघणे महत्त्वाचे आहे.
- काही मुख्याध्यापकांनी सर्वच शिक्षकांच्या केल्या टेस्ट
शासनाचे स्पष्ट निर्देश ९ ते १२ वर्गातील शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या टेस्ट करण्याचे होते. परंतु काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्वच शिक्षकांच्या टेस्ट करवून घेतल्या आहे. त्यामुळे कोरोना तपासणी केंद्रावर गर्दी झाल्याने अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. शनिवारी काही शिक्षकांनी टेस्ट केल्या, त्याचा अहवाल ४ दिवसांनी मिळेल, असे सांगण्यात आले.
- जबाबदारीची चालाढकल
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे ढकलली. सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक प्रशासन आता ही जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्याच्या तयारीत आहे.