लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुपर बग्स’ अर्थात रोग पसरविणाऱ्या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूची चर्चा सध्या देशभर होत आहे. नागपुरातील शेकडा १.१ टक्के रुग्ण सध्या या विषाणूंच्या संसर्गात असल्याची माहिती डॉ. समिर पालतेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.डॉ. पालतेवार म्हणाले, मागील ३० वर्षात क्वचितच नवे जीव प्रतिरोधक अँटीबायोटिक वैद्यकीय जगतात आले आहे. नवीन औषधांची अजूनही प्रयोगशाळांमध्ये चाचणी सुरू आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला या दृष्टीने जागृत करण्याची गरज आहे. माणसाच्या शरीरामध्ये वाढणारे विषाणू आपली प्रतिकारक्षमता अनावश्यक डोजेसमुळे वाढवितात. प्रतिजैविकाचा दुरुपयोग थांबवून पृथ्वीला विनाशकारी संसर्गाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.पशुपालन आणि कुक्कुटपालनामध्ये सर्रास प्रतिजैवकाचा वापर केला जातो. फळांची वाढ लवकर होण्यासाठीही याचा वापर केला जातो. व्यक्तीच्या आहारात हे आल्यावर मानवी शरीरामध्ये सुपर बग्सचा धोका वाढतो. ८० टक्के सर्दी-पडशावरील उपायासाठी कोणत्याही प्रतिजैवकाची गरज पडत नाही. जुलाबात बरेचदा विषाणूंचे संक्रमण असते. अशा अनेक वेळी अँटीबायोटिक न घेताही दुरुस्त होता येते. त्यामुळे उठसूठ अशा औषधांचे सेवन टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.या जनजागृतीसाठी मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्यावतीने संक्रमण रोग नियंत्रणावर सातवी चिंतन बैठक २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. यात १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होत असून अनेक तज्ज्ञमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. या पत्रकार परिषदेला संक्रमकरोग तज्ज्ञ सल्लागार डॉ. अश्विनी तायडे, डॉ. अनुराधा देशमुख, डॉ. अजय बोल्ले, डॉ. अतुल राजकोंडावार उपस्थित होते.काय आहे सुपर बग्सअन्य किटाणूंपेक्षा अनेक पटींनी प्रतिकारक्षमता वाढलेले विषाणू म्हणजे सुपर बग्स. मागील ३० वर्षांमध्ये प्रतिबंधात्मक औषधोपचार तसेच अँटोबायोटिक घेण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. साध्या आजारासाठी मोठे डोज घेण्याची मानसिकता वाढली आहे. कोणत्याही विषाणूंच्या तापामध्ये अँटीबायोटिक डोज दिले जातात. यामुळे विषाणूंची प्रतिकारक्षमता मागील ३० वर्षात वाढल्याचे आरोग्य विभागाच्या अध्ययनातून पुढे आले आहे. आजारांमध्ये अँटीबायोटिक दिल्यावर सर्वसाधारण विषाणू तर मरतात, मात्र हे सुपर बग्स रुग्णाचे शरीर जर्जर करतात.
नागपुरातील शेकडा एक टक्के रुग्ण सुपर बग्सच्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 9:44 PM