-मेडिकलच्या डॉक्टरांनी वाचविला जीव : ३७ दिवस होता व्हेंटिलेटरवर
सुमेध वाघमारे
. नागपूर : कधीकाळी अधिक प्रमाणात आढळून येणारा परंतु आता दुर्मिळ झालेला धनुर्वाताच्या (टिटॅनस) उपचारासाठी आलेला रुग्ण, मिनिटामिनिटाल त्याला येत असलेले गंभीर झटके, शरीराला आलेला धनुष्यासारखा वाकडेपणा, प्रभावित झालेली त्याची ‘ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम’, यामुळे अनियंत्रित झालेला रक्तदाब, व्हेंटिलेटरवर झालेले ३७ दिवस, या सर्वातून रुग्णाला वाचविणे एक आवाहनच. परंतु परिश्रम, अनुभव व कौशल्याच्या बळावर डॉ. मिलिंद व्यवहारे व त्यांच्या चमूने रुग्णाला आजारातून सुखरूप बाहेर काढत नवे जीवन दिले.
ही घटना कुठल्या खासगी रुग्णालयातील नव्हे, तर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आहे. प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रेवा शहरातील १४ वर्षीय मुलगा ‘कपिल’ला (काल्पनिक नाव, ओळख लपविण्यासाठी) कधीतरी जखम झाली. त्याकडे त्याचे आणि कुटुंबाचे दुर्लक्ष झाले, परंतु साधारण १० दिवसानंतर त्याला अचानक झटके येऊ लागले. कुटुंबातील सदस्यांनी त्याला रेवा येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तब्बल सात दिवस त्याच्यावर उपचार झाले,परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहत तातडीने नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. येथे दोन दिवस उपचार झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मेडिकलमध्ये पाठविले. मेडिकलच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद व्यवहारे यांनी सांगितले, ७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता रुग्ण जेव्हा आला तेव्हा त्याची प्रकृती फार गंभीर होती. मिनिटामिनिटाला तो झटके देत होता. शरीर धनुष्यासारखे वाकडे झाले होते. धनुर्वाताच्या जंतूचा प्रभाव ‘ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम’ म्हणजे ‘स्वायत्ता चेत्तासंस्थे’वर झाला होता. हृदयाचे ठोके नीट पडत नव्हते. रक्तदाबही कमी जास्त होत होता. तो स्वत:हून श्वासही घेऊ शकत नव्हता. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे अतिदक्षता विभागात भरती करून व्हेंटिलेटरवर ठेवले. सलग ३७ दिवस त्याला व्हेंटिलेटरची गरज पडली. या दरम्यान त्याची अनेकदा प्रकृती अत्यवस्थ झाली, परंतु डॉक्टरांच्या पथकाने हार मानली नाही. अखेर मागील काही दिवसांत त्याच्यात सुधारणा होत गेली. बुधवारी त्याला ‘आयसीयू’मधून काढून सामान्य वॉर्डात दाखल केले.
-व्हेंटिलेटरवरून काढून त्याला सामान्य करणे कठीण
रुग्ण ३७ दिवस व्हेंटिलेटरवर असल्याने त्यातून त्याला बाहेर काढणेही आवाहनात्मक होते. परंतु सर्वांच्या प्रयत्नातून ते शक्य झाले. या दिवसात त्याच्या शरीराला गरज असलेल्या न्यूट्रिशियन्स, इलेक्ट्रॉल व इतरही द्रव्य पदार्थाची काळजी घेण्यात आली. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, असेही डॉ. व्यवहारे यांनी सांगितले.
-या डॉक्टर, परिचारिकांच्या प्रयत्नांना आले यश
अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. प्रवीण शिंगाडे, डॉ. अभिषेक पांडे, डॉ. पवन खत्री, डॉ. अनुभव चक्रबर्थी, डॉ. मेघना, डॉ. अवनीत कौर, डॉ. पूजा घुगे, डॉ. इशांक शर्मा, परिचारिका अलका बेलसरे, गीता किन्नाके, जयश्री फटिंग आदींनी परिश्रम घेतले.
-धनुर्वातावर उपचार अतिशय अवघड
धनुर्वात (टिटॅनस) या रोगावरील उपचार अतिशय अवघड. त्यामुळे तो होऊच न देणे म्हणजे तातडीने ‘टीटी’चे इंजेक्शन घेणे गरजेचे असते. धनुर्वाताचे जंतू शरीरात शिरल्यावर जवळपास १० दिवसानंतर ते ॲक्टिव्ह होतात. हे जंतू डोके व मानेच्या नसांवर हल्ला करतात. धनुर्वात केवळ गंजलेल्या लोखंडामुळे होतो हा गैरमसज आहे. सुई, टाचणी टोचल्याने झालेल्या खोलवर जखमेतसुद्धा धनुर्वाताचे जंतू वाढू शकतात. मेडिकलमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच हा धनुर्वाताचा रुग्ण आढळून आला.
=डॉ. मिलिंद व्यवहारे, प्रमुख, अतिदक्षता विभाग, मेडिकल