लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरातील शास्त्रज्ञ पक्षी आणि इतर वन्यजीवांवर साथराेगाचा प्रभाव कसा होतो याचा अभ्यास करीत आहेत. मानवांवर पक्षी आणि निसर्गाचे सकारात्मक आरोग्य फायदेदेखील पाहत आहेत. सध्यातरी काेराेना व पक्षी यांचा संबंध दिसून आला नाही. मात्र स्थलांतरित पक्षी हे अनेक आजारांचे वाहक असतातच व यात साथीच्या आजारांचाही समावेश असताे.
नागपूरचे व्हेटरनरी सर्जन डाॅ. हेमंत जैन यांच्या मते वटवाघळाचा काेराेनाशी संबंध जाेडला गेला आहे पण पक्ष्यांपासून हाेणाऱ्या इतरही आजारांचा उल्लेख हाेणे आवश्यक आहे. स्थलांतरित पक्ष्यांपासून हाेणारा ‘एव्हीएन एन्फ्लूएंजा’ हा काॅमन आजार सर्वश्रुत आहे. विशेषत: वाईल्ड बर्ड्समुळे ताे हाेताे. अभयारण्य, तलाव आदी भागात वावरणारे पक्षी याचे वाहक असतात. मासेमार, वन कर्मचारी किंवा पक्षी निरीक्षण करणाऱ्यांमध्ये संसर्ग हाेताे. ग्रामीण भागात दलदलीच्या शेतात काम करणारे मजूर, शेतकरी, मासेमार यांच्यमध्ये दिसणारे फंगल इन्फेक्शन हेही पक्ष्यांमुळे हाेण्याची शक्यता आहे. खाेकला, ताप, छातीत दुखणे, स्नायूंचे दुखणे यांसारखी लक्षणे आढळतात. बदक प्रजातीच्या प्रवासी पक्ष्यांद्वारे हाेणारा एव्हिएन सिटॅकाेसिस हा जीवाणूपासून हाेणारा आजार श्वसन क्षमतेवर परिणाम करणारा आहे. त्यांचा संसर्ग दाेन ते सात दिवस राहण्याची शक्यता असते. मृत पक्ष्याचे सेवन केल्याने किंवा आजारी पक्ष्याला हाताळल्याने साल्माेनिलाेसिस हा आजार जीवघेणा ठरण्याची शक्यता डाॅ. जैन यांनी व्यक्त केली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे टीबी हाेण्याची शक्यताही त्यांनी नाेंदविली आहे. शिवाय जंगली पाेपट, कबूतर आदी पक्ष्यांपासून अस्थमा हाेण्याचा धाेका हाेताे. यापासून वाचण्यासाठी डाॅ. जैन यांनी काही नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
- मासेमारांनी घरी आल्यानंतर पूर्ण स्वच्छता पाळणे.
- पक्षी निरीक्षकांनी घरी परतल्यानंतर आपली चप्पल, जाेडे बाहेरच स्वच्छ करावे. त्यांची माती घरात जायला नकाे. साेबत कपडे, गाॅगल्स व इतर साहित्य पूर्ण स्वच्छ करून घ्यावे.
- हात स्वच्छ धुणे, चेहऱ्याची स्वच्छता पाळणे गरजेचे आहे.
- पक्षी निरीक्षण करताना मास्क वापरावा. तलाव किंवा दलदलीच्या ठिकाणच्या पाण्याचा वापर करू नये.
- स्थलांतरीत पक्षी स्थानिक पक्ष्यांमध्येही संसर्ग देण्याची शक्यता आहे. त्यामुळे हाताळताना काळजी घ्यावी.