लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनैतिक संबंधातून एका महिलेने तिच्या मुलाच्या मदतीने आपल्या प्रियकराची हत्या केली. रविवारी मध्यरात्रीनंतर जरीपटक्यात झालेल्या या थरारक हत्याकांडाचा सोमवारी सकाळी उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला तसेच तिच्या मुलाला अटक केली आहे. सोनिया आणि तिचा मुलगा समीर ऊर्फ सोनू अशी आरोपींची नावे आहेत.शाहबान ऊर्फ बबलू शाबीर लाल हाशमी (वय ५२) असे मृताचे नाव आहे. जरीपटक्यातील कामगारनगरात म्हाडा कॉलनी आहे. येथे शाबीर राहत होता. तो गुन्हेगारी वृत्तीचा आणि व्यसनी होता. त्याच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून त्याची पत्नी मुलांना घेऊन त्याला सोडून निघून गेली होती. त्यामुळे तो एकटाच राहायचा. घराशेजारी राहणाऱ्या सोनियासोबत त्याचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. सोनियादेखील दारूडी आहे. तिचा पती आजारी असून, मुलगा एका दुकानात कामाला आहे. ती एका बिर्याणी सेंटरमध्ये काम करायची. सोनिया दारूचे व्यसन भागविण्यासाठी शाबीरकडे जायची. बहुतांश रात्री ते दारू पिऊन एकत्रच राहत होते. हा सर्व प्रकार दोघांच्याही घरच्यांना माहीत होता. मात्र आजारी पती आणि नुकताच वयात आलेला मुलगा तिला टोकण्यापलीकडे काही करू शकत नव्हते तर शाबीर घरच्यांना मानत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून शाबीर सोनियाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. याच कारणावरून दोन दिवसांपूर्वी सोनियासोबत त्याचा कडाक्याचा वाद झाला होता. रविवारी दुपारी सोनिया काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन शाबीरने तिला मारहाण केली. त्यामुळे सोनिया संतापली होती. त्याला धडा शिकविण्याच्या तयारीने तिने मुलाला फोन करून मारहाणीची माहिती दिली. रात्री सोनू कामावरून परतल्यानंतर त्याला तिने शाबीर ब्लॅकमेल करतो, मारहाण करतो, असे सांगितले. आधीच सोनूच्या मनात शाबीरबद्दल द्वेष होता. या घटनेने त्याचा काटा काढण्याची भावना सोनूच्या मनात बळावली.या पार्श्वभूमीवर, शाबीरने रविवारी रात्री सोनियाला घरून बोलवून आपल्या रुमवर नेले. तेथे ते दारू प्यायले. टुन्न झालेला शाबीर घोरू लागताच सोनियाने सोनूला बोलवून घेतले. सोनू लाकडी दंडुका घेऊन पोहोचला. गाढ झोपेत असलेल्या शाबीरच्या डोक्यावर लाकडी दंडुक्याचे फटके मारून सोनू आणि सोनियाने त्याला झोपेततच रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर म्हाडा कॉलनीत थरार निर्माण झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस तसेच गुन्हे शाखेचा ताफा तेथे पोहचला. रात्रीच्या वेळी शाबीरसोबत कोण होते, याची पोलिसांनी शेजाऱ्यांना विचारणा केली असता, शेजाऱ्यांनी सोनियाचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला आणि नंतर सोनूला ताब्यात घेतले. या दोघांच्या शरीरावर, कपड्यावर रक्ताचे डाग होते. मात्र, त्यांनी प्रारंभी शाबीरची हत्या केल्याचा इन्कार केला. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच मायलेकांनी शाबीरची हत्या केल्याचे कबूल करून त्यामागचे कारणही सांगितले.मटक्याचा अड्डा चालवायचा शाबीरशाबीरचे जरीपटका ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यासोबत मधूर संबंध होते. त्यामुळे घराजवळ आणि बाजूच्या चौकात तो खुलेआम मटक्याचा अड्डा चालवायचा. यातून त्याने मोठी माया जमविली होती.