नागपूर : साधारण विमा कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी संघटनांच्या जॉइंट फोरमच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार बुधवारी देशभरातील साधारण विमा कर्मचाऱ्यांनी भोजन अवकाश पूर्व दोन तासांचा बहिर्गमन संप केला.
सरकारने बजेटमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील एका साधारण विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याचा विरोध करण्यासाठी तसेच विमा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक मर्यादा ७४ टक्केपर्यंत वाढविण्याच्या घोषणेविरोधात हे आंदोलन करण्यात आले. तसेच ऑगस्ट २०१७ पासून प्रलंबित वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना १९९५च्या जुन्या योजनेची सदस्यता द्यावी, वेतन करारासोबत पेन्शन अपडेट करण्यात यावी व फॅमिली पेन्शन कमीतकमी ३० टक्के मिळावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन होते.
नागपूर शहरात साधारण विमा कर्मचारी सकाळी ठीक ११.३० वाजता दोन तासांसाठी बहिर्गमन करते झाले. यामुळे साधारण विमा कंपन्यांची सेवा विस्कळीत झाली होती. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन संयुक्त समितीने हा आंदोलनाचा निर्णय घेतला होता. संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.