नागपूर: थेट एटीएम मशीन काढून नेण्याची आणि गर्दीच्या भागातही एटीएम फोडून पैसे लंपास केल्याच्या घटना ताज्या असतानाच नागपुरातील एसटीएमची सुरक्षा आऊटसोर्सिंग केलेल्या खासगी सुरक्षा गार्डच्या भरोशावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरांना मोकळे रान मिळाले आहे. बहुतांश एटीएममध्ये असलेले कॅमेरे पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत किंवा अलार्मही वाजत नसल्याने एटीएमसह ग्राहकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.लोकमतने विविध बँकांच्या एटीएमची पाहणी केली असता बहुतांश एटीएमबाहेर सुरक्षा गार्ड नव्हते. काही ठिकाणी असलेले गार्ड खासगी कंपन्यांचे होते.
त्यांच्याकडे सुरक्षेसाठी काहीही साधने नव्हती. नंदनवन भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम आणि बँक ऑफ बडोदाच्या एटीएमबाहेर सुरक्षा गार्ड नव्हते. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एटीएममध्ये पैसे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरले जातात. सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी एटीएमच्या सुरक्षेसाठी आऊटसोर्सिंगवर भर दिल्याचे दिसून येते. खासगी एजन्सीसुद्धा गार्डला ८ तासाची पूर्ण रक्कम न देताना त्यांच्याकडून १२ तास काम करून घेतात. त्यामुळे सुरक्षा गार्ड पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत, असा दावा बँक कर्मचारी संघटनांचा आहे. याकडे बँक व्यवस्थापनाने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे संघटनांचे पदाधिकारी म्हणाले.
एटीएम फोडून रक्कम लंपास करण्यास चोरांना नेहमीच अपयश येते. एटीएमच्या सुरक्षेसाठी बँक ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल करते. पण बँक सुरक्षेवर दुर्लक्षच करते. या संदर्भात पोलीस विभागाने बँकांच्या व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत. पण ठोस उपाययोजना करण्यासाठी काहीही पाऊले उचलण्यात येत नाहीत.
रात्री एटीएमच्या सुरक्षेचे काय?रात्री एटीएमची पाहणी केली असता कुठेही सुरक्षा गार्ड दिसला नाही. रात्री एटीएमच्या सुरक्षेचे काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. केवळ एटीएमच्या आतील कॅमेºयाच्या आधारे सुरक्षा करण्यात येत असल्याचे सूत्रांचे मत आहे. कॅमेºयासह अलार्म यंत्रणा सुरक्षेचे काम करीत असल्याचे बँकेचे मत आहे.