लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सरासरी २६ हजार ९० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ हजार ६५८ बाधित शेतकरी आहेत. जिल्ह्यात जुलै व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे उमरेड भिवापूर, कुही, कामठी आदी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीसंदर्भात सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.अतिवृष्टी व पुरामुळे ३१ जुलै रोजी भिवापूर व उमरेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार २ कोटी ७२ लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले क्षेत्र, शेतकरी व नुकसानीपोटी आवश्यक असलेल्या निधीबाबत संयुक्त सर्वेक्षण सुरू आहे.जिल्ह्यात ३१ जुलै रोजी भिवापूर तालुक्यात १३९ मि.मी., उमरेड १३५.०३ मिमी तर नागपूर ग्रामीणमध्ये ८७ मिमी. पावसाची नोंद २४ तासांत झाली होती. त्यामुळे भिवापूर तालुक्यातील ३ हजारपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी भिवापूर तालुक्यात २९० मि. मी., कुही १४३ मि.मी., उमरेड ११९ मि.मी. तर कामठी तालुक्यात १०३ मि.मी. पाऊस पडला.अतिवृष्टी व पुरामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सात व्यक्ती मृत झाल्या असून मृत व्यक्तींच्या वारसांना २० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. याच काळात ८२ जनावरे दगावली असून मदतीपोटी ४ लाख ९१ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ३३३ घरांचे नुकसान झाले आहे.गेल्यावर्षीेच्या नुकसानभरपाईच्या निधीचे वाटपमागील वर्षाच्या खरीप हंगामाचे दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने काटोल, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील ८० हजार ४३१ शेतकऱ्यांना ५४ कोटी ५६ लक्ष रुपये तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील २८ हजार ५९५ शेतकऱ्यांना ३१ कोटी ३० लक्ष ८६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमीन वाहून तसेच खरडून गेलेल्या जमिनीच्या क्षेत्रासाठी ८३८ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख ९३२ हजार रुपयांचे तसेच याच कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी २ हजार ६८३ शेतकऱ्यांना ९४ लाख ८६ हजार रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीतील बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपाचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे २६ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:20 PM
अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर जिल्ह्यातील सरासरी २६ हजार ९० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ हजार ६५८ बाधित शेतकरी आहेत.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात सरासरी ११५.१२ टक्के पाऊस