नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ६० वर्षांवरील ज्येष्ठांचा प्रतिसाद वाढतच चालला आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात तब्बल ५३२६ ज्येष्ठांनी लस घेतली. ज्येष्ठांसोबतच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ‘को-मॉर्बिडिटीज’ लाभार्थ्यांचीही लसीकरणात भर पडली आहे. ११९१ लाभार्थ्यांनी लस घेतली. विशेष म्हणजे, १६ शासकीय केंद्रावर १२४६ तर २५ खासगी केंद्रांवर १८२१ ज्येष्ठांनी लस घेतली.
नागपूर ग्रामीणमध्ये लसीकरणाच्या तिसºया टप्प्याला ज्येष्ठ नागरिकांचा व ‘को-मॉर्बिडिटीज’ लाभार्थ्यांचा थंड प्रतिसाद मिळत होता. परंतु शुक्रवारी यात दुपटीने वाढ झाली. २२५८ ज्येष्ठांनी तर ४३७ ‘को-मॉर्बिडिटीज’ लाभार्थ्यांनी लस घेतली. शहरात शासकीय व खासगी केंद्र मिळून ६० वर्षांवरील ३०६७ लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला. ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ७५७ लाभार्थ्यांचाही यात समावेश होता. शासकीय केंद्रात सर्वाधिक ३१० ज्येष्ठांचे लसीकरण मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात झाले. तर सर्वात कमी, केवळ ७ लाभार्थ्यांचे लसीकरण मनपाच्या मेहंदीबाग नागरी आरोग्य केंद्रात झाले.