लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवैधरीत्या बांगलादेशी तसेच रोहिंग्या राहत आहेत. त्यांची पोलिसांनादेखील सखोल माहिती आहे. नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे. सोमवारी नागपूर टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.देशात ‘सीएए’ कायदा लागू झाला असून तो देशातील अल्पसंख्यांकांविरोधात नाही. इतर देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकता देणारा हा कायदा आहे. परंतु ‘सीएए’ व ‘एनआरसी’च्या नावाखाली काही विशिष्ट तत्त्वांकडून राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘एनपीआर’ (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) तर काँग्रेसनेच आणला होता. परंतु आता मतांच्या राजकारणातून काँग्रेसकडूनच याला विरोध होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे व त्यांची यादी प्रकाशित झाली पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी तत्काळ निर्देश दिले पाहिजे. या घुसखोरांची पाठराखण करण्यासाठी काही तत्त्व मुस्लिम व बहुजन समाजात वैचारिक विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना खोटी माहिती देऊन संभ्रमित करण्यात येत आहे. असे करणाऱ्या नेत्यांच्या सभांना परवानगी देऊ नये व खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील गिरीश व्यास यांनी केली. पत्रपरिषदेला भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजयुमो शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, भाजपचे प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, राजेश शर्मा, अन्नू शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपुरात ५० हजारांहून अधिक रोहिंग्या : गिरीश व्यास यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:31 PM
नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे.
ठळक मुद्देराज्यातील घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी