नागपूर : अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर विभागात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे.
गेल्या वर्षी रेल्वेची धडक बसल्यामुळे, रेल्वे खाली झोकून दिल्यामुळे, कुणाला रेल्वे समोर ढकलून दिल्यामुळे तर कुणाचा तोल जाऊन पडल्यामुळे एकूण २९८ जणांचा बळी गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची माहिती आरटीआय कार्यकर्त्यांने मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून सन २०२० ते २०२३ पर्यंत चार वर्षाची माहिती पुढे आली. त्यातून उघड झालेला मृत्यूचा आकडा धक्कादायक आहे.
सन २०२० मध्ये विविध कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची संख्या १५५ आहे. २०२१ मध्ये १९० जणांचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये हा आकडा २९८ वर पोहोचला. २०२३ मार्च अखेर पर्यंत नागपूर विभागात तब्बल ६५ व्यक्तींचा रेल्वेमुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. गेल्या चार वर्षातील ही आकडेवारी बघता रेल्वेने ठार होणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते.