लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : संपूर्ण जिल्ह्यात काेराेनाचा प्रकाेप दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांपासून तरुण व ज्येष्ठांनाही काेराेनाची लागण हाेत आहे. अशातच बाेरखेडी रेल्वे येथे काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पंचायत समितीचे उपसभापती संजय चिकटे यांच्या कुटुंबात काेराेनाने शिरकाव केला; परंतु सकारात्मक विचार व न डगमगता काेराेनाशी दाेन हात करीत चिकटे कुटुंबियांनी काेराेनावर मात केली.
नागपूर (ग्रामीण) पंचायत समितीचे उपसभापती असल्याने शासकीय जबाबदारीसह सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत गेल्या वर्षभरापासून चिकटे हे काेराेना निर्मूलनासाठी जनजागृतीसह परिसराचा दाैरा करीत हाेते. अशातच १२ एप्रिलला ते काेराेना संक्रमित झाले. काेविड रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनी घरातील सदस्य आई, पत्नी व दाेन मुलांची काेराेना चाचणी करून घेतली. या चाचणीत आई व मुलांचा रिपाेर्ट निगेटिव्ह आला, तर पत्नी अर्चना यांचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला. यामुळे त्यांनी दाेन्ही मुलांना आपल्या सासुरवाडीला उमरेड येथे पाठविले. पती-पत्नी दाेघेही घरीच गृहविलगीकरणात उपचार घेत हाेते. अशात चिकटे यांना त्रास वाढत असल्याचे जाणवल्याने ते रुग्णालयात भरती झाले.
पत्नी अर्चना या काेराेना पाॅझिटिव्ह हाेत्या. पत्नीचा गृहविलगीकरणाचा काळ संपला नव्हता. मुले व म्हातारी आई सासुरवाडीला हाेती. यामुळे मनात घालमेल व अस्वस्थता हाेती. अशाही परिस्थितीत संजय चिकटे डगमगले नाहीत. रुग्णालयातून फाेनद्वारे पत्नी, आई व मुलांना धीर दिला. डाॅक्टरांनी दिलेले उपचार व औषधांचे पूर्ण डाेस घेऊन प्रकृतीत सुधारणा हाेत गेली. मात्र, स्वत: रुग्णालयात, तर पत्नी घरी काेराेना पाॅझिटिव्ह असल्याने अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर सतत जगण्याची उमेद घेऊन सकारात्मक विचार करीत हाेते. त्याचा प्रत्यय म्हणून संजय चिकटे यांची प्रकृती सुधारली आणि ५ मे रोजी रुग्णालयातून सुटी मिळाली. ताेपर्यंत पत्नी अर्चना याही काेराेनामुक्त झाल्या. संकटकाळात तुमचे पद, प्रतिष्ठा, ओळख व पैसा तुम्हाला वाचवू शकत नाही, तर तुमचे कर्मच जगण्याची प्रेरणा देत असल्याचे चिकटे आवर्जून सांगतात.