लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी एकदा वर्धा ते नागपूर ८५ किलोमीटरची पदयात्रा व नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनावर खोटेपणाचा आरोप करीत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांसाठी लढणाऱ्या युवा संघटनेने थेट पंतप्रधान मोदींना साकडे घालण्यासाठी बापुकुटी, सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च काढला आहे. ‘देव (देवेंद्र) से महादेव (नरेंद्र मोदी) तक’ या शिर्षकाखाली सुरू झालेले हे सायकल आंदोलन मंगळवारी नागपूरला पोहचले.‘युवा, परिवर्तन की आवाज’ या संघटनेच्या माध्यमातून निहाल पांडे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारक व जबरानजोतधारकांचा लढा लढविला जात आहे. २३ जुलै रोजी बापुकुटी, सेवाग्राम येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी या आंदोलनकर्त्यांनी नागपूरला धडक दिली. या आंदोलनात संघटनेच्या ५६ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून मार्गात येणाºया ५६ जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्काम करून दिल्लीला पोहचतील. हा १३०० किलोमीटरचा प्रवास करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागण्यांचे निवेदन देणार आहेत. बुधवारी सकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील.निहाल पांडे यांनी सांगितले, केंद्र व राज्य शासन गरिबांना घरे देण्याचा दावा करते. मात्र जे लोक ४०-५० वर्षापासून ज्या ठिकाणी राहतात त्यांना स्वमालकीचे पट्टे देण्यात येत नाही. त्यासाठी नियम, कायद्याची कारणे दिली जातात. २३ मार्च रोजी संघटनेच्यावतीने हजारो लोक ८५ किलोमीटरची पदयात्रा करून वर्ध्याहून नागपूरला आले होते. पण मुख्यमंत्र्यांनी पाठ दाखविली. पुन्हा ५ जुलै रोजी विधानसभेवर मोर्चा काढला, मात्र तेव्हाही त्यांनी भेट दिली नाही. यामुळे थेट पंतप्रधानांचा घेराव करू असा इशारा त्यांनी दिला. अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी मोफत घरपट्टे मिळावे,शेतकºयांचे सर्व प्रश्न निकाल लावून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी,देशात होणारे महिला अत्याचाºयांवर कठोर कार्यवाही, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आदी मागण्यांचे निवेदन त्यानंतर देणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.पालाश उमाटे,सौरभ माकोडे, समीर गिरी, पंकज गणोरे ,अक्षय बाळसराफ, सोनू दाते, स्वप्नील बावणे, आदित्य भेंडे ,विवेक राऊत ,मयूर नेहारे , निखिल नेहारे, सुमित सोनटक्के, संदीप मारवाडी, आतिष ठवकर, अक्षय ठवकर, सोनू गिले, आमीन शेख , सोमा पेंदोर , राजू मडावी, चंद्रभान मडावी , बंडू जुमडे , नितेश जुमडे, शंकर शिरनाथे आदींचा सहभाग आहे.