लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी विसर्जन काळात शहरातील तलावांच्या विसर्जनाची चिंता लागलेली असते. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे एकतर गणेशोत्सवावर बंधने आली आणि दुसरीकडे कोणत्याही तलावावर विसर्जन करण्यास संपूर्ण निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विसर्जन होणाऱ्या तलावांना प्रदूषणातून मोठा दिलासा मिळाला. दरवर्षीच्या निरीक्षणानुसार विसर्जन होताच तलावातील प्राणवायूचा स्तर खाली जातो आणि त्यातील जैवविविधतेला धोका निर्माण होतो. यावेळी मात्र असे काही झाले नाही.
कौस्तुभ चटर्जी यांच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजीलच्या टीमने केलेल्या निरीक्षणातून समाधानकारक स्थिती स्पष्ट होत आहे. तलाव किंवा नदीच्या पाण्यात ६ मिलिग्रॅम/लिटर आॅक्सिजनचे प्रमाण असणे आवश्यक आहे तरच तलावातील जैवविविधता सुरक्षित राहण्यास मदत होते. मात्र नागपूर शहरातील प्रमाण ४.५० ते ५ मिलिग्रॅम/लिटर नोंदविण्यात आले आहे. यावर्षीही संस्थेच्या टीमने गणेशोत्सवापूर्वी फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव व गांधीसागत तलावातील पाण्यात नोंदविलेले ऑक्सिजनचे प्रमाण एवढेच होते.
दरवर्षी विसर्जनापूर्वी ही स्थिती राहते, मात्र विसर्जन होताच हे प्रमाण २.५० ते ३ मिलिग्रॅमपर्यंत खाली येते. हे प्रमाण २ वर गेले तर तलावातील मासे, इतर प्राणी, वनस्पतींच्या मृत्युचे सत्र सुरू होते व जैवविविधता नष्ट होण्याची स्थिती निर्माण होते. सुदैवाने यावेळी विसर्जनच न झाल्याने बहुतेक तलाव हा धोका होण्यापासून बचावले. पूर्वी आणि आता केलेल्या तलावांच्या परीक्षणात फार फरक न झाल्याची माहिती चटर्जी यांनी लोकमतशी बोलताना दिली.सक्करदरा तलाव धोक्यात फुटाळा, सोनेगाव सुरक्षित असले तरी शहरातील ऐतिहासिक सक्करदरा तलाव धोक्यात आहे. येथील पाण्यात ३ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनचे प्रमाण असल्याचे ग्रीन व्हिजीलच्या निरीक्षणात आढळून आले. आसपासच्या वस्त्यांमधील सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. त्यामुळे नायट्रोजन, फास्फरसचे प्रमाण वाढले असून जलकुंभी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तलावातील इतर जीवजंतू आता मृतप्राय होत आहेत. हीच परिस्थिती राहिली तर नाईक तलावाप्रमाणे या तलावाची गटारगंगा होईल, अशी भीती चटर्जी यांनी व्यक्त केली.म्हणून गांधीसागरमध्ये माशांचा मृत्यूगांधीसागर तलावात काही दिवसापूर्वी माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या तलावाचे परीक्षण केले असता पाण्यातील नुकसानकारक वनस्पती (फायटोप्लॅन्क्टन्स) आणि प्राणी (झुप्लॅन्क्टन्स)चे प्रमाण वाढले आहे. शिवाय गांधीसागर व फुटाळा या दोन्ही तलावातील मासेमारी लॉकडाऊन काळात बंद असल्याने माशांची संख्या वाढली व अन्नाच्या कमतरतेमुळेही माशांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण ग्रीन व्हिजीलने नोंदविले. या निरीक्षणाला नीरी व मनपानेही दुजोरा दिल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले.