सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. नागपूर जिल्ह्यात ४,९७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये २४७२ मृत्यू झाले. यात नागपूर ग्रामीणमधील ५७७, जिल्हाबाहेरील २५९ तर इतर राज्यातील ८१ रुग्ण होते. याला घेऊन मेडिकलने केलेल्या मृत्यूच्या ‘ऑडिट’मध्ये भरती होऊनही पाच दिवसापर्यंत ५३.७ टक्के रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण धोकादायक स्थितीत होते. मृत्यूमागे या कारणासोबतच मेडिकलमध्ये पोहचण्यास झालेला उशीर, सुरुवातीच्या दिवसात न मिळालेला योग्य उपचार व औषधांचा तुटवडा आदी कारणेही पुढे केली जात आहे.
कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. मेडिकलमध्ये जानेवारी ते ३१ मे या दरम्यान ६३४७ कोरोनाचे गंभीर रुग्ण भरती झाले. यातील ३८ टक्के रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हा आकडा मोठा असल्याने स्वत: मेडिकलने पुढाकार घेत त्या मागील कारणांचा शोध घेणे सुरू केले आहे. यात मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधितांपैकी केवळ ११ टक्के रुग्णांची ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. शिवाय, १५ टक्के म्हणजे, ३६८ रुग्ण मृतावस्थेत दाखल झाले. तर, ४६९ रुग्ण (१९ टक्के ) गंभीर होऊन आल्याने त्यांचा २४ तासांच्या आतच मृत्यू झाला.
-ग्रामीणमधील ६० रुग्ण ‘ब्रॉट डेड’
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातून मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये ६० रुग्ण ‘ब्रॉट डेड’ म्हणजे रुग्णालयात मृतावस्थेत दाखल झाले, तर पहिल्या २४ तासांत १२८ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांमध्ये उमरेडमधील ५३, काटोलमधील ३८, सावनेरमधील ५१, रामटेकमधील ३०, कुहीमधील ३०, हिंगण्यामधील २६, कामठीतील १७, पारशिवनीतील ७, भिवापूरमधील ११, कोराडीतील १५, खापरखेडामधील १६, बुटीबोरीतील १०, कळमेश्वरमधील ३०, मौदामधील १२, वाडी (ग्रामीण)मधील २९, नरखेडमधील २१, दहेगावमधील ४, भिलगावमधील ६, कन्हानमधील ५, बोरखेडीमधील १, पाटणसावंगीमधील २, मकरधोकडामधील २ व इतर ग्रामीण भागातून १६३ असे एकूण ५७७ रुग्णांचा मृत्यूची नोंद आहे.
-भंडारा जिल्ह्यातील ६२ रुग्णांचा मृत्यू
जानेवारी ते मे या दरम्यान जिल्हाबाहेरील रुग्णांमध्ये भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक ६२ रुग्णांचे मेडिकलमध्ये मृत्यू झाले आहेत. या शिवाय, अकोला जिल्ह्यातील १०, अमरावती जिल्ह्यातील ३२, बुलडाणा जिल्ह्यातील ३, चंद्रपूर जिल्ह्यातील ५८, गडचिरोली जिल्ह्यातील १३, गोंदिया जिल्ह्यातील १७, जळगाव जिल्ह्यातील १, मुंबई येथील, वर्धा जिल्ह्यातील ४६, यवतमाळ जिल्ह्यातील १३, वाशिम जिल्ह्यातील २ तर नाशिक जिल्ह्यतील १ असे एकूण २५९ मृत्यू आहेत.
-मध्य प्रदेशातील ६९ रुग्णांचे गेले बळी
आजूबाजूच्या राज्यातील कोरोनाचा रुग्णांनी मेडिकलमध्ये उपचार घेतले. यात मध्य प्रदेशातील ६९, छत्तीसगड येथील ५, उत्तर प्रदेशातील ३, झारखंड येथील ३ तर बिहार येथील १ असे एकूण ८१ रुग्णांचे बळी गेले आहेत. या मागेही रुग्ण गंभीर होऊन व गुंतागुंत वाढल्यावर मेडिकलमध्ये दाखल झाल्याची कारणे दिली जात आहे.