लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या स्थितीवर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना, आजची स्थिती आणि भविष्यातील उपाययोजना यावर यात चर्चा करण्यात आली. पीएसए ऑक्सिजन प्रकल्प तातडीने सुरू झाले पाहिजेत, असा बैठकीतील सूर होता.
या बैठकीला गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विश्वजित कदम, शंभुराजे देसाई, यशोमती ठाकूर, नवाब मलिक, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, बच्चू कडू प्रामुख्याने उपस्थित होते.
दुसर्या लाटेचे परिणाम गंभीर असताना आणखी संकट गडद झाल्यास गडचिरोलीसह विदर्भातील दुर्गम भागात, तसेच सर्वच जिल्ह्यांतही आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे. भविष्यातील ऑक्सिजनची गरज भागली पाहिजे आणि त्यासाठी पीएसए ऑक्सिजन प्रकल्पांचे तातडीने कार्यान्वयन केले पाहिजे. संकट वाढले, तर अतिरिक्त मागणी लक्षात घेऊन विदर्भात लागणारा एकूण ऑक्सिजन, त्या दृष्टीने पीएसए प्लांटचे रुग्णालयनिहाय कार्यान्वयन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी आणि त्याचे नियोजन, तसेच रेमडेसिविरची मागणी आणि पुरवठा इत्यादींबाबत या बैठकीत सखोल चर्चा झाली.
पीएसए प्लांटची मागणी तत्काळ नोंदविली पाहिजे. यासाठीची प्रक्रिया कोणत्याही प्रकारच्या शासकीय नियमात अडकू नये, असे नियोजन तत्काळ करण्यात यावे, तसेच काही सिलिंडर्स ऑक्सिजनच्या वापरासाठी कन्व्हर्ट करण्याचे काम आपत्कालीन स्थितीत तातडीने केले पाहिजे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.