लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक मंगळवारी नागपुरात दाखल झाला आहे. हा स्टोरेज टँक मनोरुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लहान मुलांसाठीच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्ह्याला ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन उपलब्धताबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत तामिळनाडू येथून १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला ऑक्सिजन जम्बो टँक मंगळवारी शहरात दाखल झाला. या प्रकल्पासाठी १ कोटी ९६ लाख रुपये खर्च येणार आहे. पुढील १५ दिवसांत या टँक लागणार असून, त्यानंतर ऑक्सिजन साठवणुकीची व्यवस्था पूर्ण होणार आहे.