लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात बाहेरून ऑक्सिजनाचा पुरवठा वाढायला लागला असताना आता मात्र सिलिंडरचा तुटवडा भासायला लागला आहे. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनाचा पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. यामुळे ऑक्सिजन साठा उपलब्ध असला तरी टंचाई मात्र कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अहमदाबाद आणि औरंगाबादवरून होतो. कोरोना संक्रमणामुळे या दोन्ही ठिकाणांवरून होणारा पुरवठा कमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये जुन्या सिलिंडरवर काम भागविले जात आहे. नव्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होत नाही. बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाल्याने जिल्ह्यात सरासरी १३५ मे. टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. यातील अधिक प्रमाणात ऑक्सिजन रुग्णालयांकरिता दिला जात आहे. परंतु ज्या रुग्णालयांमध्ये सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो, तिथे ही अडचण निर्माण झाली आहे.