लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मे महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनासोबतच नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे; परंतु कोरोनावर मात देण्यासाठी आवश्यक असलेली लसीकरण मोहीम मात्र लसीच्या तुटवड्यामुळे पुन्हा एकदा मंदावली आहे. रविवारी नागपुरात एकूण १२०९ जणांचेच लसीकरण होऊ शकले. यातही शहरातील ९९९ व ग्रामीण भागातील केवळ २१० जणांनाच लस मिळाली. त्यामुळे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूत्रानुसार नागपूर महापालिकेकडे केवळ ७ हजार डोस शिल्लक आहेत. रविवारी प्रशासनाकडून मनपाला लसीचे डोस मिळाले नाही. ग्रामीण भागातही कमी पुरवठा होत आहे. कोविशिल्डचे डोस उपलब्ध आहेत; परंतु कोव्हॅक्सिन डोसचा मोठा तुटवडा आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नागपूर शहरात १५ ते १६ हजार डोस दररोज लावले जात होते; परंतु सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. केंद्र सरकार लसीकरण मोहीम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा करीत आहे; परंतु सध्याची परिस्थिती पाहता हे उद्दिष्ट खरच पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही.
मनपा प्रशासनातर्फे सोमवारी ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु कोविशिल्डचा दुसरा डोस १२ आवठड्यांनंतरच लागणार आहे. त्यामुळे दुसरा डोस लावणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. रविवारी शहरात केवळ ६६५ लोकांनीच पहिला डोस आणि ३३४ जणांची दुसरा डोस घेतला. तर ग्रामीण भागात २०१ लोकांनी पहिला, तर ९ जणांनी दुसरा डोस घेतला. लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना दररोज लसीकरण केंद्रांवरून परत जावे लागत आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, मेडिकलसह बॅ. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सिद्धार्थनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व. प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे.
बॉक्स
तीन खासगी रुग्णालयांतही शुल्क देऊन लसीकरण
शहरातील तीन खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क देऊन लसीकरणाची सुरुवात केली जात आहे. यात किंग्ससवे रुग्णालयात १ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लस दिली जाईल. वोक्हार्टमध्ये कॉर्पोरेटसोबत लसीकरणाचा करार करण्यात आला आहे. येथे ३१ मे पासूनच लसीकरणाला सुरुवात होईल. अमेरिकन ऑन्कोलॉजी येथे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात होईल. येथे कोविशिल्डचे डोस दिले जातील. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून एलेक्सिस रुग्णालय, स्पंदन येथेही शुल्कासह लसीकरणाची व्यवस्था सुरू होण्याची शक्यता आहे. येथे रुसची स्पुतनिक लस लावली जाऊ शकते. किंग्सवे रुग्णालयाचे सहायक महाव्यवस्थापक (मार्केटिंग व कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी सांगितले की, १८ ते ४४ वयागोटातील लाभार्थ्यांचे रुग्णालयात १ जूनपासून लसीकरण केले जाईल. तर अन्य वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण कायम राहील. १८ पेक्षा अधिकच्या वयोगटातील नागरिकांना नोंदणी करणे बंधनकारक राहील. त्याच्याशिवाय त्यांना लस दिली जाणार नाही. वोक्हार्टकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे ३१ मेपासून कॉर्पोरेट स्तरावर लसीकरण केले जाईल.