लाेकमत न्यूज नेटवर्क
गुमथळा : भूगाव (ता. कामठी) प्राथमिक आरेाग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये एकीकडे काेराेना संक्रमण चढतीवर असून, दुसरीकडे या गावांमध्ये काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग संथ आहे. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये कमालीची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, नागरिकांचा उपाययाेजनांबाबतचा बेफिकीरपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत असल्याची माहिती आराेग्य विभागातील जाणकार व्यक्तींनी दिली.
कामठी तालुक्यातील बहुतांश प्राथमिक आराेग्य केंद्रामधील लसींचा साठा संपला असून, नव्याने लसींची मागणी करण्यात आली. मात्र, याला भूगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणारे काही उपकेंद्र अपवाद ठरत आहेत. या केंद्रांवर राेज ७ ते १० नागरिकांचे लसीकरण केले जाते. या भागातील बहुतांश गावांमध्ये घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येतात. शिवाय, मार्च व एप्रिलमध्ये मृत्यूदरही वाढला हाेता.
यासंदर्भात काही नागरिकांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, टेस्ट केल्यावर डाॅक्टर काेराेनाची लागण झाल्याचेच सांगतात. त्यामुळे आम्ही टेस्ट करण्याच्या भरीस न पडता अस्वस्थ वाटले किंवा लक्षणे आढळून आली तर शासकीय रुग्णालयात न जाता खासगी डाॅक्टरांकडून उपचार करवून घेत असल्याचे अनेकांनी सांगितले. या भागात मातामायला पाणी नेण्यापासून तर परमात्मा एक सेवक यांचे ११ दिवसांचे कार्यक्रम अजूनही बिनबाेभाटपणे सुरूच आहेत. दुसरीकडे, स्वत:सह कुटुंबीयांचा जीव धाेक्यात टाकून आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आशासेविका व अंगणवाडी सेविका लस घेण्याबाबत घराेघरी जाऊन जनजागृती करीत आहेत.
या गंभीर प्रकाराकडे स्थानिक लाेकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे तर नागरिक खरेदी करताना गर्दी करणे, मास्क न वापरणे यासह अन्य प्रतिबंधात्मक उपाययाेजनांना फाटा देत आहेत. बहुतांश मंडळी डाॅक्टरांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता साेशल मीडियावरील चुकीच्या संदेशाचे अनुसरण करीत असल्याचेही दिसून येत आहे. या सर्व बाबी काेराेना संक्रमणास पूरक ठरत असल्याने या भागातील संक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत.
....१,३०० पैकी १५० नागरिकांचे लसीकरण
भूगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या झरप, वरंभा व चिखली या गावांमध्ये काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग अजूनही फारच संथ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या आराेग्य केंद्रात राेज केवळ कमाल १० नागरिकांचे लसीकरण केले जाते. विशेष म्हणजे, या भागात काेराेना संक्रमण आणि मृत्यूदर अधिक आहे. भूगाव येथे ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या १,३०० च्या वर आहे. मात्र, यातील १५० नागरिकांनीच लस घेतल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.