गडकरींनी दत्तक घेतलेल्या गावाचा चेहरामोहरा बदलणारअभय लांजेवार /अशोक ठाकरे - पाचगाव नागपूर मेट्रो व्हिजनमध्ये नोंद असलेले आणि उमरेड तालुक्यातील ‘गिट्टीखदान’ची आगळीवेगळी ओळख असलेल्या ‘पाचगाव’ या गावाचा चेहरा आता बदलणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमरेड-नागपूर महामार्गालगतचे सुमारे पाच हजार लोकवस्तीचे पाचगाव नावाचे गाव नुकतेच ‘दत्तक’ घेण्याची घोषणा केली. कानठळ्या बसविणारे ब्लास्टिंग, आरोग्याला हानीकारक ठरणारी गिट्टीखदानीची धूळ, पाणीटंचाई, रस्त्याची दुरवस्था, सांडपाणी या समस्येने बेजार झालेले गावकरी आता केंद्र शासनाच्या मदतीने, नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विकासगंगा येणार, गावाचा कायापालट होणार असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. नागपूर (दिघोरी)पासून केवळ किमी अंतरावर असलेल्या पाचगावची नोंद आता केंद्रस्थानी झाली असून गावकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न खरे झाले तर एक नवी ओळख पाचगावची होणार, असा विश्वास सरपंच पुण्यशीला मेश्राम, उपसरपंच रामाजी हटवार यांना वाटतो. यानिमित्ताने ‘पाचगाव’बाबत ‘आॅन दि स्पॉट’ माहिती ‘लोकमत’ने घेतली. लोकप्रतिनिधींच्या भावना, संवेदना जाणून घेतल्या. गावकऱ्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या, प्रश्न समजून घेतले. गिट्टीखदानीचे साम्राज्यपाचगाव परिसरात गिट्टीखदानीचे साम्राज्य पसरले आहेत. एकीकडे शेकडो बेरोजगारांच्या भाकरीची सुविधा या गिट्टीखदानच्या भरोशावर असली तरीही दुसरीकडे या खदानींमुळे होणारे नुकसानही धक्कादायकच आहे. वर्षाकाठी २५ ते ३० लाख रुपयाचे उत्पन्न असलेल्या या गावालगत ६८ गिट्टीखदान आहेत. गावकऱ्यांना धुळीचा होणारा त्रास अनेक वर्षापासूनचा आहे. यामुळे विविध आजाराने बेजारही होण्याची वेळ गावकऱ्यांवर येत असते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढता येईल का, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे मानले जाते.पाण्याची नासाडीगावाशेजारीच पाझर तलाव आहे. मात्र तलावाचे तोंड फुटल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असते. सन २००८ पासून खोलीकरण आणि दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु, जिल्हा परिषदस्तरावर याबाबतही कोणतीही हालचाल होत नाही. पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय वारंवार येथील लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यानंतरही कुंभकर्णी प्रशासनाला जाग येणार कधी, असा सवाल गावकऱ्यांचा आहे.तलाव खोलीकरण कधी?गावात असलेल्या जिल्हा परिषद तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी धूळखात पडली आहे. उन्हाळ्यात पाणी शुद्ध होत नाही. शिवाय दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामनाही करावा लागतो. यामुळे सन २००८ पासून या तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केल्याचे उपसरपंच रामाजी हटवार यांनी सांगितले. याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठरावही पारित करून पाठविण्यात आला. तलावाचे खोलीकरण झाले तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल शिवाय शेतीसाठीही पाण्याची सुविधा करता येईल, असेही हटवार म्हणाले. परंतु खोलीकरण होणार कधी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तलाव खोलीकरण झाल्यास कायमस्वरुपी पाणीटंचाई दूर होईल.विकासगंगा येणार; गावकऱ्यांना विश्वासकेंद्र शासनाच्या दत्तक गावाच्या संकल्पनेचे पाचगाव येथील गावकऱ्यांनीही स्वागत केले. आता विकासकामे होतील, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सुरेश नांदूरकर, ब्रम्हराज माटे, शेतमजूर नारायण ठाकरे यांनी व्यक्त केला. पाऊस आला की निंबा ते पाचगाव यादरम्यानच्या पुलावरून पाणी वाहते. अनेकदा विद्यार्थ्यांसाठी पूल धोक्याचा ठरतो. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. पांदण रस्त्याचे मातीकरण, खडीकरण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
पाचगाव झाले ‘खास’गाव!
By admin | Published: November 14, 2014 12:48 AM