लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक रुग्ण असे आहेत, ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे. ही बाब लक्षात घेता सदर येथील आयुष दवाखाना व पाचपावली येथील कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्यात यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. महापाैरांच्या या निर्देशानुसार दोन दिवसात हे सेंटर सुरू केले जातील, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. यासंदर्भात आवश्यक कारवाईचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौरांनी सांगितले की, मागच्या वेळी कोरोना संसर्ग वाढला असताना आयुष दवाखाना सदर व पाचपावली रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू होते. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजारावर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कोविड केअर सेंटरची खूप गरज आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे.