नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानुसार देशभरात आजपासून तीन दिवस हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येत आहे. देशभरातून या मोहिमेला उदंड प्रतिसाद देण्यात येत असून नेत्यांपासून, अभिनेत्यांपर्यंत, खेळाडूंपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण या मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून येते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी झाला आहेत. त्यानिमित्त त्यांनी नागपुरातील रॅलीत सहभाग घेतला.
नागपुर महानगरपालिकातर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा त्रिशरण चौक ते शतापदी चौक येथील मार्गावरुन काढण्यात आली. या पदयात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. तर, रॅलीच सांगता झाल्यानंतर पदयात्रा समापनला देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षीय भाषण केले.
'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?
तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे, पण एक काळ असा होता की प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता, असे अनेक बदल घडले, ज्यानंतर सामान्य माणूस घर, कार्यालय, शाळांमध्ये तिरंगा फडकवू शकतो.