लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्याचे मुख्य पीक सोयाबीन आणि कपाशी आहे. असे असले तरी काही भागात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यात या हंगामात धान पिकाचे एकूण क्षेत्र १,६०० हेक्टरच्या आसपास आहे. यापैकी तब्बल ८०० हेक्टर क्षेत्रात पट्टा पद्धतीने धान रोवणी होईल, असा अंदाज कृषी विभाग वर्तवित आहे. दोन वर्षांपासून पट्टा पद्धतीने धान रोवणीला शेतकरी पसंती देत असून, कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
धान रोवणीसाठी पऱ्हे तयार झाले असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकांच्या रोवण्या खाेळंबल्या आहेत. येत्या काही दिवसात पावसाची मेहेरबानी झाल्यास धान रोवणीला वेग येईल. उमरेड तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १,०३४ मिलिमीटर आहे. १ जूनपासून १९ जुलैपर्यंत केवळ ३२९.८ मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. त्यातही जून महिन्यात २२२.०१ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. जुलैच्या १९ दिवसात केवळ १०७.७९ मिलिमीटर पाऊस पडला. जुलै महिन्यातील पावसाची सरासरी घटली आहे.
पाऊस बेपत्ता असल्याने जेमतेम रोवणीला प्रारंभ झाला असून, येत्या काही दिवसात पाऊस बरसला तर या आठवड्यात धान रोवणी वाढेल. उमरेड तालुक्यात मागील वर्षी सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पट्टा पद्धतीने धान रोवणी करण्यात आली होती. यंदा ८०० हेक्टर क्षेत्रात या पद्धतीचा अवलंब होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दिली.
......
अशी आहे पद्धती
धान रोवणीच्या पट्टा पद्धतीमध्ये सहा फुटानंतर किंवा आठ फुटानंतर एक ते दीड फुटाचा पट्टा सोडावयास सांगितला जातो. रोवणी करतानाच ठराविक अंतराचा पट्टा सोडून रोवणी करावी, असे मत कृषी सहायक अरुण हारोडे यांनी व्यक्त केले. या पद्धतीचा अवलंब केल्यास पिकांमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश मिळत असल्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. पिकांची दाटी होत नाही. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. लोंबीमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. शिवाय फवारणी आणि खते देण्यासाठी सोयीचे होते, अशीही बाब हारोडे यांनी सांगितली. रसशोषण करणारे आणि धान पिकांचा नायनाट करणारे तपकिरी तुडतुडे किड यावरही उत्तम नियंत्रण साधता येते. यामुळे बियाण्यात, खर्चात बचत होत उत्पादनात वाढ होते.
....
परिसरातील धान क्षेत्र
उमरेड तालुक्यातील सिर्सी, बेला हा भाग कपाशीचा मानला जातो. उर्वरित बहुतांश भाग हा सोयाबीन पिकाने व्यापला आहे. अशातच सोयाबीन, कपाशीसह धानाचे उत्पादन असंख्य शेतकरी घेतात. उमरेड तालुक्यातील सायकी, गांगापूर, पिराया, उमरेड, पाचगाव, गावसूत, आपतूर, बाह्मणी, ठोंबरा, वडांद्रा, खेडी, सेव, कऱ्हांडला, तिरखुरा, कळमना, धुरखेडा क्षेत्रात धान उत्पादकांची संख्या बऱ्यापैकी आहे.