सावनेर : सण व उत्सव काळातील शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सावनेर पाेलिसांनी शुक्रवारी (दि. १७) शहरातील विविध मार्गाने रूटमार्च काढून जनजागृती केली.
शहरातील उपविभागीय पाेलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारातून या रूटमार्चला सुरुवात झाली. हा रूटमार्च शहरातील महात्मा गांधी चौक, राम गणेश गडकरी चौक, जयस्तंभ चौक, मडकी चौक, मुरलीधर मंदिर, होळी चौक, बाजार चौक मार्गे भ्रमण करीत पाेलीस ठाण्याच्या आवारात पाेहाेचला. तिथे या रूटमार्चचा समाराेप करण्यत आला. उपविभागीय पाेलीस अधिकारी अशाेक सरंबळकर यांच्या नेतृत्वातील या रूटमार्चमध्ये ठाणेदार मारुती मुळूक यांच्यासह सावनेर पाेलीस ठाण्यातील सात पाेलीस अधिकारी, २१ अंमलदार, नागपूर ग्रामीण मुख्यालयातील पाेलिसांचे एक पथक, राज्य राखीव पाेलीस दलाचे एक अधिकारी, २४ जवान व १४ हाेमगार्ड सहभागी झाले हाेते.