लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील १४ वर्षीय पाेलीस पुत्राचा डेंग्यूमुळे शनिवारी (दि. २८) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरात डास प्रतिबंधक उपाययाेजना व डेंग्यूबाबत जनजागृती करणे गरजेचे असताना ही बाब स्थानिक नगर परिषद प्रशासनाने अद्याप फारशी गांभीर्याने घेतली नाही.
वैभव सुजित गजभिये (१४, रा. गौतमनगर, छावणी परिसर, कामठी) असे मृताचे नाव आहे. सुजित गजभिये कामठी (जुनी) पाेलीस ठाण्यात शिपाईपदी कार्यरत आहेत. वैभव तापाने आजारी असल्याने त्याच्यावर खासगी डाॅक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले हाेते. दरम्यान, त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे रिपाेर्टमध्ये स्पष्ट हाेताच तसेच प्रकृती खालावत असल्याने त्याला कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे शनिवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून शहरात पावसाचा लपंडाव सुरू आहे. त्यातच तापमान व उकाड्यात वाढ झाली आहे. सततचे दमट वातावरण, शहरात ठिकठिकाणी आढळून येणारा कचरा व घाण, माेकळ्या जागेवरील सांडपाणी व पावसाच्या पाण्याचे डबके यामुळे डासांच्या पैदासीला अनुकूल वातावरण मिळत आहे. शहरातील डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्थानिक पालिका प्रशासनाने डास प्रतिबंधक औषधांची धूरळणी करायला हवी. नागरिकांमध्ये जनजागृती व सर्वेक्षण करून काेरडा दिवस पाळण्याची सूचना करायला हवी, असेही काही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
...
बालकांमध्ये आजाराचे प्रमाण अधिक
कामठी शहरातील १० वर्षाखाली मुले आणि ४० वर्षावरील नागरिकांमध्ये तापाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात काही डेंग्यू तर काही विषाणूजन्य तापाच्या रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती शहरातील खासगी डाॅक्टरांनी दिली. शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी तर खासगी डाॅक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. खासगी डाॅक्टरांकडे रुग्णांच्या आजारनिहाय नाेंदी नसल्याने रुग्णांची नेमकी संख्या कळू शकत नाही.