नरेश डोंगरे नागपूर : पहलगाम हल्ल्याचे वेळी घटनास्थळी असलेले नागपुरातील रुपचंदानी कुटुंबीय सुखरूप आहे. मात्र, हल्ला झाल्याचे माहिती पडल्यापासून तो त्यांच्याशी संपर्क होईपर्यंतच्या दोन-तीन तासापर्यंत रुपचंदानी यांच्या नातेवाईकांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला होता. अखेर त्यांच्याशी संपर्क झाला अन् आम्ही सुखरूप आहोत... तुम्ही काळजी करू नका, असे सांगून पहलगाम हल्ल्याचे साक्षीदार ठरलेल्या नागपूरकर रुपचंदानी कुटुंबीयांनी त्यांच्या येथील नातेवाईकांना आश्वस्त केले.
जरीपटक्यातील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणारे रुपचंदानी कुटंबीय व्यापारी असून, गांधीबागमध्ये त्यांचे प्लास्टिकचे दुकान आहे. येथून ते १४ एप्रिलला दोन आठवड्याच्या काश्मिर टूरवर गेले होते. २७ एप्रिलला ते नागपुरात परत येणार होते. मात्र, आज पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर त्यात रुपचंदानी परिवारसुद्धा जखमी झाल्याचे वृत्त नागपुरात आले आणि जरीपटका सिंधी कॉलनीत भितीचे वातावरण निर्माण झाले. येथून त्यांच्या नातेवाईकांनी हालचाल जाणून घेण्यासाठी संपर्क करणे सुरू केले. मात्र, बराच वेळपर्यंत त्यांच्याशी संपर्कच होत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांमध्ये रडारड सुरू झाली.
दरम्यान, रात्री ९च्या दरम्यान अखेर सिमरन रुपचंदानी यांच्याशी संपर्कही झाला. हल्ल्यानंतर निर्मांण झालेल्या धावपळीत पायाला दुखापत झाली. दुसरे काहीही नाही आम्ही तिघेही सुखरूप आहोत, असे सिमरनने त्यांच्या स्थानिक नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर आमचा जीव भांड्यात पडल्याची प्रतिक्रिया सिमरन यांचे नातेवाईक उमेश रुपचंदानी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. यासंबंधाने अधिक बोलणे झाले नाही. त्यामुळे आम्हाला फारसे काही सांगता येणार नसल्याचे उमेश यांनी सांगितले.