नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजप व काँग्रेसचे ‘पहले आप-पहले आप’ सुरू आहे. दोन्ही पक्ष एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याची वाट बघत आहेत. दरम्यान, काँग्रेसचा उमेदवार निश्चितीसाठी मंगळवारी रात्रीही काँग्रेस नेत्यांची बैठक झाली नाही. आता बुधवारी मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक होत आहे.
मंगळवारपर्यंत एकूण ६ उमेदवारांनी एकूण १० अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या समर्थनाच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. कपिल पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.
कपिल पाटील यांनी मेळावा घेत शिक्षक भारती शिक्षकांच्या प्रश्नासाठी कसा लढा देत आहे, याचा आढावा मांडला. फुले-शाहू-आंबेडकर अध्यापक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. अजय विठ्ठलराव भोयर व मृत्युंजय सिंह यांनीही अर्ज भरले. मंगळवारीही काँग्रेस व भाजपकडून उमेदवाराची घोषणा झाली नाही.
शिक्षक भारतीचे उमेदवार नागो गाणार यांना बदलायचे का, यावर खल सुरू आहे. काँग्रेसमध्येही विमाशिचे सुधाकर अडबाले की शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान, काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून नागपूर शिक्षक मतदारसंघ व अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.