लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सद्यस्थितीत वेदना हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची वेदना पायाच्या वेदनेहून महत्त्वाची नाही, असे भाष्य केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावरून ममता यांच्यावर हल्लाबोल करत राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या तेव्हा त्यांची वेदना दिसली नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे माझा पाय ठीक झाल्यावर इतर कुणीही बंगालच्या जमिनीवर चालूदेखील शकणार नाही, असा इशाराच ममता यांनी दिला.
बांकुरा जिल्ह्यातील राणीबंध येथे शहा यांनी रॅलीदरम्यान वेदनेचा मुद्दा उपस्थित केला. ममता बॅनर्जी लवकरच ठीक होतील. मात्र, ज्या भाजप कार्यकर्त्यांची तृणमूलच्या शासनकाळात हत्या झाली त्यांच्या कुटुंबीयांची वेदना सरकारला दिसली नाही. तृणमूलकडून आदिवासींना प्रमाणपत्रासाठी कमिशन मागण्यात येते. आमची सत्ता आली तर आदिवासींच्या भूमी अधिकारांना संरक्षण देण्यात येईल, असे शहा म्हणाले. शहा यांची झाडग्राम जिल्ह्यातदेखील रॅली होती. मात्र, ऐनवेळी हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे त्यांनी व्हर्च्युअल भाषण केले.
ममतांचा पुनरोच्चार, माझ्याविरोधात षडयंत्रच
नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नव्हता असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला होता. मात्र, झालदा येथे प्रचार सभेदरम्यान ममता यांनी माझ्याविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. माझा संघर्ष सुरूच राहणार असून काही दिवसांत माझा पाय ठीक होईल. मग मी पाहते की, तुमचे पाय बंगालच्या जमिनीवर मोकळेपणे कसे चालतात, या शब्दांत भाजपच्या नेत्यांना इशारा दिला. जितके काम आमच्या सरकारने केले आहे तितके जगातील कुठल्याही सरकारने केलेले नाही. भाजपचे पंतप्रधान देशाला चालविण्यास सक्षम नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
ममतांनी बनू दिले नाही बंदर- गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील इगरा येथील सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ममता बॅनर्जी यांनी तेजपूर येथे प्रस्तावित बंदर होऊ दिले नाही. सोबतच नंदीग्राम येथील एक ऑटोमोबाइल कंपनी राज्याबाहेर पळवून लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप लावला.
ममतांचा निवडणूक अर्ज रद्द करा
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राम येथून उभे असलेले भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. नामांकन अर्जात बॅनर्जी यांनी सहा गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपविली आहे. यात सीबीआयच्या एका प्रकरणाचादेखील समावेश आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.