नागपूर: विमान प्रवासात एक प्रवाशाच्या कानात तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. प्रवासी कर्करोगाचा रुग्ण असल्याची माहिती आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या ६ई ५२९७ विमानातील प्रवासी सुब्रता भारती (५८) कोलकाताहून मुंबईला उपचारासाठी जात होते. भारती स्वत: दंत डाक्टर आहेत. मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता कोलकाता येथून पत्नी आणि मुलीसोबत मुंबईकडे रवाना झाले. प्रवासात त्यांना कानात तीव्र वेदना होऊ लागल्या. याची माहिती वैमानिकाला देण्यात आली. त्यांनी विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि परवानगीनंतर विमानाचे वैद्यकीय इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. सकाळी ११.१५ वाजता डॉक्टरांनी विमानतळावर त्यांची तपासणी केली अणि लगेच अॅम्ब्युनन्सने किम्स-किंग्सवे रुग्णालयात नेण्यात आले. ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सौरभ प्रसाद त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. विमान दुपारी १२ वाजता मुंबईकडे रवाना झाले.
आता विमान प्रवासाची परवानगी नाहीडॉ. भारती यांना होणारा त्रास बघता डॉक्टरांनी त्यांना रस्ते आणि रेल्वे मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला दिला. विमानात वायू दबावात होणार बदल त्यांच्यासाठी कठीण होऊ शकतो.